अकोला: शहरातील मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपींचीसुद्धा नावे दिल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे सदर पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती, तसेच शासनाकडेसुद्धा तक्रार केली होती. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची बदली केली तर सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी यांच्यासह तपास अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले.शहरात राहणाºया एका पालकाच्या तक्रारीनुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीला पवन प्रमोद नगरे, अलका नगरे यांनी फूस लावून पळवून नेले. या प्रकरणात संबंधित पालकाने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रार नोंदविल्यावरही मुलीचा शोध घेतला नाही, तसेच पोलिसांना आरोपींची नावे दिल्यानंतरही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. पोलीस अधीक्षक, ठाणेदारांकडेसुद्धा सातत्याने तक्रार केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कंटाळून पालकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून कारवाईची मागणी केली होती. याचिकेवर सुनावणी करताना, दोन महिन्यात अकोला जिल्ह्यातून ३५ महिला, युवती बेपत्ता असल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. न्यायालयाने पोलिसांना बेपत्ता मुलीला हजर करण्याचे निर्देश दिले होते. त्याचीही दखल पोलिसांनी घेतली नाही, त्यामुळे न्यायालयाने पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांना समन्स बजावला होता. त्यानंतरही पोलीस अधीक्षक गावकर न्यायालयात हजर झाले नाहीत. एकंदरीतच प्रकरणात पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकाने केला होता. याबाबत प्रसारमाध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडियाने वृत्त प्रसारित केले. त्यानंतर या प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची तडकाफडकी बदलीचे आदेश दिले, तसेच सिव्हिल लाइनचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, महिला तपास अधिकारी पीएसआय श्रीमती कराळे यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले.एनआरसी मोर्चा दरम्यान बंदोबस्तात कूचराई पातूरचे ठाणेदार गुल्हाने निलंबित!पातूरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनाही तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. पातूर येथे सीएए, एनआरसी विरोधात काढलेल्या मोर्चात कडेकोट बंदोबस्त न ठेवल्यामुळे पातुरात दगडफेक झाली होती. या प्रकरणात लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ठाणेदार गजानन गुल्हाने यांना निलंबित केले आहे.