अकोला : डॉक्टरांनी उपचार करण्यात हलगर्जी केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयातील वार्ड क्र. ९ मध्ये घडली. डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केल्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप युवकाच्या नातेवाईकांनी केला आहे. रुग्णालयात तणावाचे वातावरण असल्याने, कोतवाली पोलिसांचे पथक घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.शहरातील भीम नगरात राहणारा राम सुखदेवलाल गवई (३५) हा युवक मुंबईला नोकरी करतो. मुंबईवरून तो परत आला होता. त्याला अस्वस्थ वाटत असल्याने, त्याला गुरुवारी सकाळी सर्वोपचार रुग्णालयात वार्ड क्र. ९ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टरांनी उपचारामध्ये हलगर्जी केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याचा भाऊ गजानन सुखदेवलाला गवई याने केला. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्याने यावेळी केली. मृतक राम गवई याला दोन मुली, मुलगा, पत्नी, आई व चार भाऊ असा परिवार आहे. संतप्त नातेवाईकांनी सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली. उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी घटनास्थळावर पोहोचून संतप्त नातेवाईकांचे म्हणणे ऐकून घेतले. सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनीही संतप्त नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. गजानन गवई याने संबंधित डॉक्टरविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा तक्रार दिली.डॉक्टरांनी उपचारात हलगर्जी केली नाही. रुग्णाला ताप आला होता आणि तो ताप मेंदूपर्यंत पोहोचला होता. नातेवाईकांचा आरोप निराधार आहे. परंतु, नातेवाईकांना शंका दूर करण्यासाठी शवविच्छेदन करू. त्यातून त्याचा मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होईल.डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाताशासकीय वैद्यकीय महाविद्यालय