अकोला: नटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाउंडेशनच्यावतीने शनिवारी सायंकाळी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यामध्ये सामाजिक, कला, संगीत, चित्रपट क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी होते. प्रमुख अतिथी म्हणून निळु फुले यांचे सहकारी मित्र व ज्येष्ठ नाट्य सिने कलावंत प्रकाश वाडकर होते. स्वागताध्यक्ष म्हणून निळु फुले आर्ट फाउंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष प्रशांत फुलारी होते. विचारपीठावर नटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमेश थोरात होते. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नाट्य सिने कलावंत प्रकाश वाडकर यांनी, निळु फुले हे एक नायक, खलनायक होते. त्यांच्यातील खलनायकाचा अभिनय तर एवढा सकस होता की, प्रत्यक्षात त्यांना पाहिल्यावर महिला त्यांचा तिरस्कार करीत; परंतु निळु फुलेंना हा तिरस्कार त्यांना कामाची पावती वाटत होता. सामाजिक जीवनात अत्यंत भावनाप्रधान, हळवा माणूस म्हणून मी त्यांना अनुभवले. असे सांगत, प्रकाश वाडकरांनी निळु फुलेंच्या अनेक आठवणी सांगितल्या.प्रास्ताविकात रमेश थोरात गत वर्षांपासून निळु फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, कला, संगीत, शिक्षण आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया व्यक्तींना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. असे सांगत, निळु फुलेंच्या अनेक आठवणी रसिकांना सांगितल्या. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. नितीन धूत, संस्थेचे सचिव सुधाकर गीते, विजय मोहरील यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड. मनिषा धूत यांनी केले.
अहंकाराने माणूस मोठा होत नाही: कुळकर्णीनटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी, काही लोकं नुसतं बोलतात. काही नुसतंच काम करतात तर काहींचे कामच बोलते. पुरस्कार म्हणजे, कौतुकाची थाप आहे. रूटीन कामाचे प्रोटीन म्हणजे पुरस्कार आहे. असे सांगत, घरातील जागा संपली नाही. माणसांच्या मनातील जागा संपली आहे. अहंकार बाजूला सारा तरच माणूस मोठा होतो. अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.या व्यक्तींना प्रदान करण्यात आले पुरस्कारनटश्रेष्ठ निळु फुले आर्ट फाउंडेशनच्यावतीने समाजवैभव पुरस्कार उत्कर्ष शिशूगृहाच्या अध्यक्ष सुनंदा देसाई, अॅड. मनिषा कुळकर्णी, माधवी पाध्ये, दादा पंत, गणेश काळकर यांनी स्वीकारला. समाजभूषण पुरस्कार संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे, समाजव्रती पुरस्कार समर्पण फाउंडेशनचे अमोल मानकर, कलाभूषण पुरस्कार शास्त्रीय गायक प्रा. अनिरुद्ध खरे, कलागौरव पुरस्कार हास्यविनोदी कलावंत अरविंद भोंडे, सिनेभूषण पुरस्कार चित्रपट दिग्दर्शन नीलेश जळमकार आणि नाट्यचेतना पुरस्कार सिने युवा अभिनेत्री ऐश्वर्या राजेश तापडिया यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.