अकोला: महापालिकेत ‘आउट सोर्सिंग’च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनुसार नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. तसेच शहराच्या विविध भागातील खुल्या भूखंडांवर ‘ग्रीन झोन’(हरित पट्टे) तयार करण्यासाठी मंजूर निविदाधारकाकडे अनुभव नसल्यामुळे याविषयी पुन्हा निविदा काढण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी ‘स्थायी’ची सभा पार पडली. यावेळी खासगी कंपनीच्या माध्यमातून मनपात आरोग्य निरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या कंत्राटी नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांना पदावरून कमी करण्याचा मुद्दा भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी उपस्थित केला. त्यावर बाळ टाले, अनिल गरड यांनी कं त्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना प्रशासनाने निकषांकडे दुर्लक्ष केल्याचे मत व्यक्त केले. शैक्षणिक अर्हता नसताना मनपात कर्मचाºयांची पदभरती होतेच कशी, असा सवाल बाळ टाले यांनी उपस्थित केला. याविषयी प्रशासनाने सादर केलेली टिप्पणी व सभागृहाचे मत लक्षात घेता ‘आउट सोर्सिंग’मार्फत मनपात नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय सभापती विशाल इंगळे यांनी घेतला. शहरात हरित पट्टे तयार करण्यासाठी जलप्रदाय विभागाने निविदा प्रकाशित केली असता सर्वात कमी दराची निविदा अनिकेत अॅग्रो सर्व्हिसेस पुणे यांची मंजूर करण्यात आली होती; परंतु संबंधित एजन्सीकडे कामाचा अनुभव नसल्याचा मुद्दा भाजपचे सुनील क्षीरसागर यांनी मांडला. त्याला बाळ टाले, अनिल गरड यांनी दुजोरा देत निविदा रद्द करण्याची मागणी लावून धरली. अखेर हरित पट्ट्यांसाठी फेरनिविदा काढण्याचे निर्देश सभापती विशाल इंगळे यांनी दिले.हायड्रंटमधील गाळ कधी काढणार?पाणी टंचाईमुळे शहरातील हायड्रंटचा वापर अत्यावश्यक झाला आहे; परंतु त्यामध्ये गाळ असल्याने तो कधी काढणार, असा सवाल भारिप-बमसंच्या गटनेत्या अॅड. धनश्री देव यांनी उपस्थित केला तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. त्यावर दोन दिवसांत हायड्रंटमधील गाळ काढणार असल्याचे जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांनी स्पष्ट केले.