अकोला, दि. १३- रेल्वे स्टेशन चौकातील पोलीस चौकी येथून एका ऑटोची तपासणी करून त्यामधील चलनातून बंद झालेल्या नऊ लाख रुपयांची रोकड शनिवारी मध्यरात्री जप्त करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी आयकर खात्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती आहे. सदर ऑटोचालकाला समज देऊन सोडण्यात आले असून, या नोटांचा मालक कोण, याचा शोध आता आयकर खाते घेणार आहे.खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी अब्दुल वासिक अब्दुल हादीक (४0) हा एमएच ३0 एए ७१५७ क्रमांकाच्या ऑटोने चलनातून रद्द झालेल्या ५00 रुपयांच्या नोटांचे सात लाख रुपये आणि एक हजार रुपयांच्या नोटांचे दोन लाख रुपये असे नऊ लाख रुपये घेऊन जात असल्याची माहिती रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश सावकार यांना मिळाली. यावरून पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात प्रत्येक ऑटोची तपासणी सुरू केली असता, अब्दुल वासिक याच्या ऑटोत असलेल्या बॅगमधून ५00 आणि एक हजार रुपयांच्या नोटांची नऊ लाख रुपयांची रोकड मिळाली. रामदासपेठ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून, ती कोणाची आहे, याची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे अधिकार आयकर खात्याला असल्याने सदर प्रकरण आयकर खात्याकडे देण्यात येणार असून, त्यांच्याकडून या रकमेचा उलगडा होणार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ऑटोचालकाला समज देऊन सोडले असून, ऑटोमध्ये बॅग कुणी ठेवली, याचा शोध घेण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश आहेत.
नऊ लाख रोकडची होणार चौकशी
By admin | Published: November 14, 2016 3:02 AM