अकोला: सध्याच्या मुलांची पिढी ही अत्यंत कुशाग्र, तल्लख बुद्धीची आहे. आपल्या पिढीपेक्षा ही पिढी अनेक पाऊले पुढे आहे. या पिढीतील मुलामुलींना काय जमत नाही? सर्वच बाबतीत ही मुले उजवी आहेत. अशी एक नऊ वर्षाच्या चिमुकलीने तिच्यातील कुशाग्र बुद्धीमत्तेने लक्ष वेधून घेतले आहे. नऊ वर्षाच्या चिमुकलीने दहावी अभ्यासक्रम पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अकोल्यातील होम स्कूलमध्ये शिकणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे, उन्नती रत्नदीप गणोजे. उन्नती इयत्ता तिसरी, चौथ्या वर्गाची परीक्षा देणार नाहीतर पुढील वर्षी चक्क ती दहावीची परीक्षा देणार आहे.हे वाचुन कोणालाही धक्काच बसेल. परंतु ही बातमी शंभर टक्के खरी आहे. उन्नतीचे वय सध्या तिसरी, चौथीतील आहे. परंतु तिची तल्लख बुद्धीमत्ता दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांपेक्षाही कितीतरी पटीने सरस आहे. उन्नतीचे वडील रत्नदीप गणोजे यांनी, मुलांना आनंद देणारं आणि त्यांना पूर्ण क्षमतेने खुलण्याची संधी देणारं, जे आवडतं ते शिकू देणारं, खोलात जाऊन शिकण्याची संधी देणाऱ्या होम स्कूल ही संकल्पना सुरू केली. स्वत:च्या मुलीलाच त्यांनी होम स्कूलमध्ये घातले. कुशाग्र बुद्धीमत्तेच्या उन्नतीने अभ्यासातही उन्नती साधत, वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षीच इयत्ता दहावी पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तिला पुढल्या वर्षी इयत्ता १० वी ची परीक्षा द्यायची असल्या कारणाने उन्नतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची २0 मार्च रोजी मुंबईत भेट घेतली आणि त्यांना परीक्षा देण्यासाठी परवानगी मागितली. मुख्यमंत्री फडणविस, शिक्षण मंत्री तावडे यांनी तिला दहावी परीक्षा बसण्यासाठी परवानगी देण्याचे आश्वासन दिले आहे. शासनाने परवानगी दिलीतर उन्नती ही दहावीची परीक्षा देणारी सर्वात कमी वयाची ब्रिलियंट स्टुडंट ठरणार आहे.परवानगी साठी नुकतेच एक निवेदन तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेन्द्रजी फडणवीस व शिक्षण मंत्री श्री. विनोद्जी तावडे यांना सादर केले त्यांनी यासाठी तिला परवानगी मिळवून देण्याचे आश्वासन देखील दिले. शिक्षण हे सक्तीचे नव्हे तर आनंददायी असले पाहिजे या विचारातून काम करणाºया होम स्कूलने उन्नतीच्या बुद्धीमत्तेला योग्य दिशा दिली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये उन्नती चक्क दहावीची परीक्षा द्यायला निघाली. तिचे हे धाडस, तिचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.
शासनाच्या मुक्त शाळा संकल्पनेनुसार अकोल्यात होम स्कूल सुरू केली. शाळेत न जाता, होम स्कूलच्या माध्यमातून मुलांच्या बुद्धीमत्तेला, त्यांच्यातील कौशल्याला चालना देऊन त्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न होत आहे.-रत्नदीप गणोजेपालक व संचालक, होम स्कूलदुर्गा चौक, अकोला