- नितीन गव्हाळे
अकोला : इयत्ता नववी, दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा सराव व्हावा, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांची आॅनलाइन टेस्ट होणार आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना ईझी अॅप डाऊनलोड करून मोबाइलवरून ही टेस्ट द्यावी लागणार आहे.इयत्ता दहावीचा नवीन बदललेला अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीचा विचार करता, जिल्ह्यातील इयत्ता नववी व दहावीतील विद्यार्थ्यांच्या क्षमता स्थिती समजून घेण्यासाठी आणि अध्ययन स्तर समजून घेण्यासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करून ईझी अॅपच्या माध्यमातून विनामूल्य मोबाइलवरच आॅनलाइन टेस्ट घेण्यात येणार आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी ही आॅनलाइन टेस्ट कोणाच्याही मोबाइलचा एकवेळ वापर करून देऊ शकतील. मुख्याध्यापकांनाही यासंदर्भात माध्यमिक शिक्षण विभागाने सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना (पहिल्या वेळेस) दिलेल्या आॅनलाइन टेस्टचा निकाल संबंधित मुख्याध्यापकांच्या मोबाइलवर ईझी अॅपवर उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी ईझी अॅपचा वापर करून १७ ते १९ जुलैदरम्यान एकवेळ गणित व विज्ञान विषयाची आॅनलाइन टेस्ट द्यावी. ही टेस्ट ऐच्छिक राहणार आहे.कशी राहील आॅनलाइन टेस्टअॅप इन्स्टॉल करण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ यू-ट्यूब वर दिला आहे. त्याची लिंक एटीटीपीएस://युटू.बीई/एक्स व्ही डब्लू डब्लू के व्ही क्यू आहे. नववी, दहावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी अॅन्ड्रॉइड मोबाइलवर ईझी अॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करून गणित व विज्ञान विषयाचे पायाभूत चाचणी पेपर लगेच सोडवू शकतात. ज्या विद्यार्थी, पालकांकडे अॅन्ड्रॉइड मोबाइल नाही, त्यांनी शिक्षकांच्या किंवा इतर पालकांच्या मोबाइलवर सुद्धा टेस्ट द्यावी. एकाच मोबाइलचा उपयोग करून कितीही विद्यार्थी पेपर सोडवू शकतात. प्रत्येकाचा निकाल वेगळा जतन केल्या जातो. त्यामुळे कोणताच विद्यार्थी पायाभूत चाचणीपासून वंचित राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या पालकाचा मोबाइल नंबर व स्वत:च्या शाळेचा यू-डायस कोड माहीत असावा. पेपर सोडविल्यानंतर विद्यार्थ्याला लगेच त्याचा निकाल बघायला मिळेल. कोणता प्रश्न चुकला, कोणता बरोबर हे सुद्धा कळेल. किती गुण मिळाले हे सुद्धा कळणार आहे.
विद्यार्थ्यांची आकलन क्षमता, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ‘ईझी अॅप’च्या माध्यमातून नववी, दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ही टेस्ट होणार आहे. त्याचा विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. यातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजेल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक