अकाेला: उध्दवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गुवाहाटीवरुन परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना बाळापूर मतदारसंघातून दुसऱ्यांदा तसेच जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांना अकाेला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, उध्दवसेनेने अकाेट विधानसभा मतदारसंघावरही दावा केला हाेता. परंतु पहिल्या यादीत अकाेटमधील दावेदाराचे नाव नसल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
उध्दवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा करण्यात आला हाेता. यामध्ये बाळापूर, अकाेला पूर्व व अकाेट विधानसभा मतदारसंघाचा समावेश हाेता. मागील काही दिवसांत मुंबइत महाविकास आघाडीच्या पार पडलेल्या बैठकांमध्ये जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांवर गहन चर्चा करण्यात आली. यामध्ये उध्दवसेना व काॅंग्रेसला दाेन मतदारसंघ व राष्ट्रवादी काॅंग्रेस (एसपी)पक्षाला एक मतदारसंघ देण्याच्या हालचालींनी वेग घेतला. दरम्यान, जागा वाटपाच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत एकमत झाल्यानंतर २३ ऑक्टाेबर राेजी उध्दवसेनेने पहिल्या यादीत राज्यातील ६५ उमेदवारांच्या नावावर शिक्कामाेर्तब केले. यामध्ये संकटकाळात पक्षासाेबत एकनिष्ठ राहणाऱ्या बाळापूरचे विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. तसेच अकाेला पूर्व मतदारसंघातून सेनेचे जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांना उमेदवारी देण्यात आली.
अकाेट मतदारसंघावर सस्पेन्स कायम
काही दिवसांपूर्वी उध्दवसेनेने जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघावर दावा केला हाेता. यामध्ये अकाेट मतदारसंघाचाही समावेश हाेता. परंतु पक्षाने प्रसिध्द केलेल्या यादीत अकाेट मतदारसंघातील उमेदवाराचा समावेश नसल्यामुळे दुसऱ्या यादीत या मतदारसंघाचा समावेश हाेइल का, अथवा हा मतदारसंघ काॅंग्रेसच्या वाट्याला जाइल का, याबद्दल सस्पेन्स निर्माण झाला आहे.
काॅंग्रेस दाेन व राकाॅंच्या वाटेला एक मतदारसंघ?
जिल्ह्यातील पाचपैकी उध्दवसेना व काॅंग्रेसला प्रत्येकी दाेन मतदारसंघ व राष्ट्रवादी काॅंग्रेस (एसपी)पक्षाला एक मतदारसंघ देण्यावर खलबते सुरु आहेत. तसे झाल्यास काॅंग्रेसला अकाेला पश्चिम व अकाेट मतदारसंघ तसेच राष्ट्रवादीला मुर्तिजापूर मतदारसंघ दिल्या जाइल.