अकोला : विधानसभेत निलंबित झालेल्या आमदारांना जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) सभेच्या कामकाजात सहभाग घेता येतो का, अशी विचारणा करीत, भाजपचे निलंबित आमदार हरीष पिंपळे यांचे नाव न घेता, ‘डीपीसी’ सभेतील कामकाजात त्यांच्या सहभागावर शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी आक्षेप घेतला. सभेचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी तत्काळ विधानसभा सचिवांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेतल्यानंतर निलंबित आमदारास ‘डीपीसी’ सभेच्या कामकाजात सहभाग घेता येत असल्याचा निर्वाळा दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शनिवारी जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्यात आली. पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला आमदार डाॅ. रणजित पाटील, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. अमोल मिटकरी, आ. ॲड. किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांना निलंबित करण्यात आले असून, त्यामध्ये जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीष पिंपळे यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेने निलंबित केलेल्या आमदारांना जिल्हा नियोजन समितीच्या सभेतील कामकाजात सहभाग घेता येतो का, अशी विचारणा शिवसेनेचे आ. नितीन देशमुख यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुषंगाने यासंदर्भात पालकमंत्र्यांनी विधानसभा सचिवांसोबत भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून माहिती घेतली. विधानसभा सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित आमदारास जिल्हा नियोजन समिती सभेतील कामकाजात सहभाग घेता येतो, असा निर्वाळा पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिला. त्यानुसार भाजपचे निलंबित आमदार पिंपळे यांनी जिल्हा नियोजन समिती सभेच्या कामकाजात सहभाग घेतला.
सुकोडा येथील पाणीपुरवठा योजनेसाठी
तरतूद का केली नाही; आमदार आक्रमक!
अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात अकोला तालुक्यातील सुकोडा येथील स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची उद्भव विहीर खचली असून, जलवाहिनी वाहून गेली. पाणीपुरवठा योजना वाहून गेल्याने गावातील पाणीपुरवठा बंद झाला. त्यानुषंगाने पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने २७ लाख रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले; मात्र ‘डीपीसी’ निधीतून या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी तरतूद का करण्यात आली नाही, अशी विचारणा करीत, आ. नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानुषंगाने सुकोडा येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी लवकरच तरतूद केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी सभेत सांगितले.
नुकसानीचे पंचनामे झालेल्या
अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत द्या!
पूर ओसरल्यानंतर पंधरा दिवस उलटले. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या अकोला शहरातील घरांचे पंचनामे प्रशासनामार्फत करण्यात आले; मात्र घरांचे नुकसान झालेल्या अनेक अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना अद्याप मदत मिळाली नसल्याचा मुद्दा आ. गोवर्धन शर्मा यांनी ‘डीपीसी’ सभेत उपस्थित केला. त्यानुषंगाने घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेल्या अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना तातडीने मदत वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले.