अकोला : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यामध्ये क्षाराचे प्रमाण प्रतिलीटर ५०० मिलीग्रॅमपेक्षा अधिक असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत ठराव घेतलेल्या ठरावासह प्रस्ताव जिल्हा परिषदेत सादर करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. पाण्याच्या रासायनिक आणि जैविक गुणधर्मात बदल झाल्याने त्याचा सजीवांवर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच प्रसिद्ध केला आहे. सोबतच पाणी पुरवठा व स्वच्छता साहाय्य संस्थेनेही पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी केली आहे.भूगर्भ जल गुणवत्ता निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी सामू, एकूण कठीणपणा, कॅल्शिअमचा कठीणपणा, मॅग्नेशिअम, क्लोराइड, एकूण विरघळलेले पदार्थ, फ्लोराइड, नायट्रेट, सल्फेट या घटकांचा विचार केला जातो. अकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची २०१७ मध्ये आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. अकोला शहरासह सात तालुक्यांतील एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी १४२७ नमुन्यांत नायट्रेटचे प्रमाण मानवी आरोग्यास हानिकारकतेच्या मर्यादेपलीकडे असल्याचे पुढे आले. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानिकारक असल्याचे नमूद आहे. ३१९ नमुन्यांतील पाण्याचा कठीणपणा अधिक आहे. पाणी अधिक आम्लारीधर्मी असल्याचे १४१ नमुन्यांच्या तपासणीत पुढे आले. या पाण्याच्या वापरामुळे मानवास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी पाणी गुणवत्तेसाठी ग्रामपंचायती, आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये किडनीच्या आजाराने मृत्यूच्या घटनाही होत आहेत.त्यामुळे राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता साहाय्य विभागाने रासायनिक तपासणीच्या अहवालानुसार जलशुद्धीकरण यंत्रे बसविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेला पत्र देत ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचा ठराव सादर करण्याचे पत्र पाठविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत घेतलेल्या ठरावात अटी व शर्तीसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
क्षाराचे प्रमाण अधिक असलेल्या गावांची संख्यातालुका गावेअकोला ३२अकोट १३बार्शीटाकळी ६३बाळापूर ३०मूर्तिजापूर ४७पातूर २१तेल्हारा ४०