अकोला, दि. १0- वीज देयकांच्या थकबाकीदारांकडून थकबाकी वसूल करण्यास महावितरणने प्रारंभ केला असून, वीज देयक न भरणार्या सर्वच प्रकारच्या थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. जिल्हय़ातील महानगरपालिका व नगरपालिकांच्या अखत्यारीत येत असलेल्या पथदिव्यांची वीज देयकाची थकबाकी ४२ कोटींवर पोहोचल्याच्या पृष्ठभूमीवर महावितरणने या स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटिस बजावल्या असून, त्वरित देयक भरले नाही, तर वीज जोडणी कापण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.वीज देयक थकीत असलेल्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांची वीज जोडणी खंडित करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिले आहेत. या पृष्ठभूमीवर थकबाकी असलेल्या राज्यभरातील सर्वच वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांवर विशेष जोर देण्यात येत आहे. जिल्हय़ातील ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीच्या पथदिव्यांच्या वीज देयकापोटीची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच असून, डिसेंबर २0१६ अखेरपर्यंत ४२ कोटी रुपये थकले आहेत. थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणचे चार प्रादेशिक संचालक व १६ परिमंडळांच्या मुख्य अभियंत्यांना थकबाकी वसुलीवर जोर देण्याचे निर्देश दिले आहेत, त्यामुळे संपूर्ण राज्यात थकबाकी वसुलीस वेग आला आहे. या पृष्ठभूमीवर महावितरणने अकोला महानगरपालिका व सहा नगर परिषदांना वीज देयक भरण्याबाबत नोटिस जारी केल्या आहेत.
मनपा, न.पा.च्या पथदिव्यांची वीज जोडणी तोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 2:35 AM