मनपाच्या स्थायी समिती सभागृहात मंगळवारी दुपारी सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. मनपाच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या सायकल खरेदी व हळदीकुंकू प्रकरणाचा अहवाल सभागृहात सादर करण्यात आला असता सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभेचे कामकाज सांभाळणाऱ्या उपायुक्त वैभव आवारे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. या दाेन्ही प्रकरणांत नेमके दाेषी काेण व त्यांच्यावर काय कारवाई झाली, असा सवाल राजेश मिश्रा यांनी वारंवार उपस्थित केल्यानंतरही उपायुक्त आवारे यांनी समाधानकारक खुलासा केला नाही. दाेषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता प्रशासनाने बदल्यांचा नवीन फंडा सुुरू केल्याचा आराेप मिश्रा यांनी केला. कारवाईचा अहवाल सभागृहात सादर केल्यावरही प्रशासनाने साधलेली चुप्पी पाहता प्रशासनावर सत्तापक्षाचा दबाव असल्याचा आराेप मिश्रा यांनी करताच भाजपचे सदस्य विजय इंगळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
चाैकशी हाेइपर्यंत अधिकारी पदावर कशा?
सायकल खरेदीप्रकरणी शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना, महिला व बालकल्याणच्या प्रभारी अधिकारी नंदिनी दामाेदर यांची उपायुक्त पूनम कळंबे यांनी चाैकशी केली. हळदीकुंकू प्रकरणी नंदिनी दामाेदर यांना कारणे दाखवा नाेटीस बजावून चाैकशी करण्यात आली. चाैकशी पूर्णहाेइपर्यंत दाेन्ही महिला अधिकारी त्याच पदावर कशा, त्या पदावर कायम असल्यामुळे चाैकशी प्रभावित झाली नाही, असे नानाविध प्रश्न राजेश मिश्रा यांनी उपस्थित केले. शाैचालय घाेळ प्रकरणी लिपिकाला तातडीने निलंबित करण्यात येऊन चाैकशी करण्यात आली, याची आठवण त्यांनी करून दिली.
सभापती म्हणाले आयुक्तांसाेबत चर्चा करताे !
प्रशासनाने सायकल व हळदीकुंकू प्रकरणाचा अहवाल सभेत सादर केला असला तरी कारवाई काेणावर करायची हे स्पष्ट नाही. हा विचित्र प्रकार पाहता अहवाल लक्षात घेऊन कारवाईचा अधिकार सभागृहाला असून, सभापती सतीश ढगे यांनी कारवाई करावी, अशी मागणी राजेश मिश्रा यांनी केली असता आयुक्त संजय कापडणीस यांच्यासाेबत चर्चा करून करून कारवाई करू, असे सांगून सभापती ढगे यांनी वेळ मारून नेली.