अकाेला : अकाेला जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर अशाेक अमानकर यांची नियुक्ती केल्यानंतर महानगर अध्यक्षपदासाठी लवकरच घाेषणा हाेईल, या आशेवर असलेल्या इच्छुकांच्या नशिबी प्रतीक्षाच आली आहे. पंधरवडा उलटून गेल्यामुळे आता इच्छुकांचा जीव टांगणीला लागला असून मार्चेबांधणीने वेग धरला आहे. महानगर अध्यक्षपदावर बबनराव चाैधरी यांची नियुक्ती झाल्यापासूनच काँग्रेसमधील एक गट त्यांच्या विराेधात गेला हाेता ताे आजतागायत तसाच कायम आहे. चाैधरी यांच्या संपूर्ण कार्यकाळात त्यांना हटविण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी झाल्या, मात्र चाैधरी सर्वांना उरून पुरले. त्यांचे पद कायम राहिले. उलट याच पदावर असताना त्यांना पक्षाने राज्य कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी अशी बढतीही दिली. या बढतीमुळे महानगरअध्यक्षपद आता लवकरच नव्या नेतृत्वाच्या हाती साेपविले जाईल अशी आशा इच्छुकांना हाेती. त्यामुळे अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे माेर्चेबांधणीही केली. मात्र पंधरवडा उलटल्यावरही महानगरअध्यक्षपदाची घाेषणा झालेली नाही. काँग्रेसने अमानकर यांच्या रूपाने मराठा कार्ड खेळले असल्याने आता महानगरअध्यक्षपदासाठी मराठेतर समाजाचा विचार हाेईल, अशी धारणा काहींची आहे. दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते अजहर हुसेन यांनी मुस्लीम, मराठा यांच्यासह हिंदी भाषिक नेतृत्वाला संधी देण्यापेक्षा मराठी भाषिक व्यक्तीला संधी द्यावी, अशी पक्षाकडे विनंती केली असल्याने महानगरअध्यक्षपदासाठी चुरस आणखी वाढली आहे. या पदासाठी राजेश भारती, साजीदखान पठाण, डाॅ. प्रशांत वानखडे, प्रदीप वखारिया, कपिल रावदेव असे अनेक पर्याय पक्षाकडे आहेत.
बाॅक्स...
चाैधरींच्या मुदतवाढीसाठी ज्येष्ठ नेत्याचे साकडे
विद्यमान अध्यक्ष बबनराव चाैधरी यांनाच आणखी सहा महिन्यांसाठी कायम ठेवण्यात यावे असे साकडे पक्षश्रेष्ठींना एका ज्येष्ठ नेत्यांनी घातले आहे. दरम्यान, यासंदर्भात महानगरातील नेत्यांना माहिती हाेताच शहरी व ग्रामीण असा वाद उभा राहिला आहे. ग्रामीणमध्ये पक्षाचे काम करणाऱ्यांनी शहरातील नेतृत्व काेणाकडे असावे याबाबत आग्रह का धरावा, असा प्रश्नही यावेळी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.