अकोला, दि. १0- महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग करणार्यांविरोधात घरबसल्या तक्रार नोंदवण्यासाठी प्रशासनाने 'कॉप' मोबाइल अँप तयार केले. तक्रारकर्त्यांंची नावे गोपनीय ठेवण्याची यामध्ये तरतूद असताना आजपर्यंंत मनपाकडे एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याने सदर अँपकडे अकोलेकरांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. महापालिक निवडणुकीसाठी रिंगणात उभे असणार्या उमेदवारांची प्रचार यंत्रणा जोराने कामाला लागली आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेणे, गरजू मतदारांना काय हवे काय नको, याची विचारपूस केली जात आहे. अर्थातच, निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात आचारसंहिता लागू असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासकीय यंत्रणेवर सोपविण्यात आली असून उमेदवारांच्या प्रभागात आचारसंहितेचे पालन होते किंवा नाही, हे पाहण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी पथके तैनात केली आहेत. यामध्ये मनपा अधिकारी, कर्मचार्यांसह इतर शासकीय विभागातील अधिकार्यांचा समावेश आहे. महापालिकेत आचारसंहितेचा भंग झाल्यास तक्रार कक्षाचे गठन करण्यात आले असून या ठिकाणी अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आचारसंहितेचा भंग करणार्या उमेदवारांच्या विरोधात मतदारांना घरबसल्या तक्रारी करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मोबाइलद्वारे 'कॉप' अँप तयार करण्यात आले. सदर अँपवर अद्यापपर्यंंत मनपाकडे एकही तक्रार प्राप्त नसल्यामुळे अकोलेकरांनी अँपकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रशासकीय यंत्रणा हवी सतर्कमहापालिका प्रशासनाने स्थानिक अधिकारी, कर्मचार्यांची झोननिहाय पाच पथके गठित केली. पथकातील सर्वच अधिकारी-कर्मचारी स्थानिक असल्यामुळे निवडणुकीच्या चर्चा, उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोयीचे आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींवर विसंबून न राहता मनपाची प्रशासकीय यंत्रणा सतर्क असणे अपेक्षित आहे.