अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतीचे नुकसान झाले असून, नुकसानीचा अहवाल गत आठवड्यात जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला असला तरी, नुकसान भरपाइच्या मदतीचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे पिकांसह शेती नुकसानीची मदत मिळणार तरी केव्हा, याबाबतची प्रतीक्षा जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्हयात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मूसळधार पावसामुळे जिल्हयातील नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्हयात खरीप पिकांसह भाजीपाला फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतजमीन खरडून गेल्याने जिल्हयातील शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हयातील पिकांसह शेतीच्या नुकसानीचा अहवाल १० आॅगस्ट रोजी शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्हयात १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविल्यानंतर आठवडा उलटून गेला; मात्र नुकसान भरपाइची मदत अद्याप शासनाकडे जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे पिके आणि खरडून गेलेल्या शेतजमीनीच्या नुकसान भरपाइची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्हयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पीक नुकसानीचे असे आहे वास्तव !
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात १ लाख ७८ हजार ८३ शेतकऱ्यांचे १ लाख २१ हजार २९५ हेक्टर क्षेत्रावरील जिरायत पिकांचे नुकसान झाले असून, १ हजार ४१ शेतकऱ्यांचे ५७९ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिके आणि ९०९ शेतकऱ्यांचे ५४२ हेक्टर क्षेत्रावरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.
१६,६४९ शेतकऱ्यांची खरडून गेली शेतजमीन !
अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात १६ हजार ६४९ शेतकऱ्यांची ९ हजार ३८ हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. पिकांसह शेतजमीन खरडून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मदतीपोटी ११५ कोटी केव्हा मिळणार?
जिल्हयातील पिकांच्या नुकसानासह खरडून गेलेल्या शेतजमीनीच्या नुकसान भरपाइची मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मदत निधी अद्याप शासनाकडून उपलब्ध झाला नसल्याने, नुकसान भरपाइच्या मदतीपोटी मदतनिधी मिळणार केव्हा, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.