तेल्हारा : तालुक्यातील गाडेगाव येथील सरपंच प्रमोद ज्ञानदेवराव वाकोडे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर शनिवारी झालेल्या ग्रामसभेच्या निवडणुकीत सरपंचांच्या बाजूने ७२१ एवढे मतदान झाले असून, विरोधात ४४० एवढे मतदान झाले. ८४ मतदान अवैध ठरविण्यात आले. २८१ मतांच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव बारगळला.
तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत सरपंच प्रमोद वाकोडे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आला असता शासन निर्णयाप्रमाणे गाडेगाव ग्रामपंचायतमध्ये २६ डिसेंबरला ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेमध्ये गावातील महिला पुरुषांनी एकूण १,२४५ मतदान झाले. त्यापैकी सरपंचाच्या बाजूने ७२१ एवढे, तर विरोधामध्ये ४४० एवढे मतदान झाले एकूण मतदान २,७५४ होते. त्यापैकी १,२४५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
एक महिन्यापूर्वी गाडेगावचे सरपंच प्रमोद वाकोडे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित झाला होता. त्याविरुद्ध सरपंचांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली हाेती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला स्थगिती दिली. त्यानंतर शासन निर्णयाप्रमाणे यापूर्वी सरपंच जनतेतून निवडून गेल्यामुळे सरपंचावर अविश्वास ठराव हा ग्रामसभेतून घेतल्या जावा, असे निर्देश आल्यामुळे शनिवारी अविश्वास प्रस्तावाबाबत ग्रामसभा घेण्यात आली. २८१ मतांच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव बारगळला. मतदानप्रक्रियेदरम्यान महिलांचे प्रथम मतदान घेण्यात आले. त्यानंतर पुरुषांचे मतदान घेण्यात आले. सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे जाहीर होताच सरपंच समर्थकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला.
ग्रामसभेला तेल्हारा तहसीलदार गुरव, नायब तहसीलदार विजय सुरळकर, ग्रामविकास अधिकारी गजानन मेतकर, तेल्हारा ठाणेदार दिनेश शेळके ताफ्यासह उपस्थित होते. यावेळी राखीव पोलिस दलाची दहाची तुकडी तेल्हारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, हिवरखेडमधील सात पोलिस कर्मचारी, दहीहंडामधील पाच पोलीस कर्मचारी , १५ होमगार्ड एवढा ताफा गाडेगावमध्ये तैनात केला होता.