अकोला : अकोलापंचायत समितीमध्ये पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून सोमवारपासून अकोला पंचायत समितीमध्ये नागरिकांसाठी कामाशिवाय प्रवेशास मनाई (नो-एन्ट्री) करण्यात आली आहे.अकोला पंचायत समितीमधील एक कर्मचारी गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर शुक्रवारी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये पंचायत समितीच्या विविध विभागातील चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अकोला पंचायत समितीमधील कोरोनाबाधीत कर्मचाऱ्यांची संख्या पाच झाली. या पृष्ठभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि पंचायत समितीमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता, सोमवारपासून अकोला पंचायत समितीमध्ये कामाशिवाय प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. कामाशिवाय नागरिकांना पंचायत समितीमध्ये प्रवेश नसल्याची सूचना फलक पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर प्रशासनामार्फत लावण्यात आला आहे. त्यामुळे काम नसलेल्या नागरिकांना पंचायत समितीमध्ये प्रवेश मिळणार नाही.
अकोला पंचायत समितीमध्ये कामाशिवाय ‘नो-एन्ट्री’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2020 10:46 AM