अकोला : अकोल्यासह विदर्भात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. प्रवाशांच्या माध्यमातून परभणीत कोरोनाचा संसर्ग होऊ नये, या अनुषंगाने अकोल्यासह विदर्भातूनपरभणीसाठी बस सोडू नये, असे आदेश एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागातर्फे देण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातून परभणीसाठी सुटणाऱ्या एस. टी. बसेस हिंगोलीपर्यंतच धावणार असल्याची माहिती एस. टी. महामंडळाच्या अकोला विभागातर्फे देण्यात आली आहे. विदर्भात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत आहे. कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता परभणी जिल्हा प्रशासनाने विदर्भातील ११ जिल्ह्यातून येणाऱ्यांवर परभणी जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे अकोल्यातून परभणीसाठी बस न सोडण्यासंदर्भात एस. टी. महामंडळाच्या परभणी विभागाने अकोल्यासह विदर्भातील सर्वच एस. टी. विभागाला कळविण्यात आले आहे. परंतु, अत्यावश्यक असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्याशिवाय विदर्भातील ११ जिल्ह्यातील लोकांना परभणीत प्रवेश दिला जाणार नसल्याचे एस. टी. महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातर्फे प्राप्त पत्रात अकोल्याहून परभणीसाठी बसेस न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे परभणीसाठी सोडण्यात येणाऱ्या बसेस आता केवळ हिंगोलीपर्यंतच धावणार आहेत.
- चेतना खिरवाडकर, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ, अकोला