अकोला: सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील सराइत, कुख्यात गुंडांवर ‘एमपीडीए’अॅक्ट नुसार तसेच तडीपार करण्यासाठी जिल्हा पाेलिस प्रशासनाने बाह्या वर खाेचल्या आहेत. दरम्यान, तत्कालीन पाेलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी दाेन अट्टल गुन्हेगारांवर दाेन वर्षांसाठी तडीपारची कारवाइ केली असता, या निर्णयाच्या विराेधात दाेन्ही गुन्हेगारांनी अमरावती येथील विभागीय आयुक्त निधी पांडेय यांच्याकडे अपील दाखल केले हाेते. यावर दाेन्ही गावगुंडांना जिल्ह्यात ‘नाे एन्ट्री’चा आदेश विभागीय आयुक्तांनी दिला आहे.
संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून शहरातील बांधकाम व्यावसायिक, खासगी शिकवणी संचालक, माेठे हाॅटेल व्यावसायिक, कंत्राटदार व बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना धमक्या देत खंडणी वसूल करणे, सावकारीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मालमत्तांवर कब्जा करणाऱ्यांची टाेळी सक्रिय आहे. अशा टाेळ्यांचा बंदाेबस्त करण्याची नितांत गरज असल्याची बाब ध्यानात घेऊनच तत्कालीन जिल्हा पाेलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी ‘एमपीडीए’ व तडीपारीचे हत्यार उपसले हाेते. त्यावेळी जी.श्रीधर यांनी ‘रेकाॅर्ड ब्रेक’कारवाया करीत संघटितपणे दहशत निर्माण करणाऱ्यांचे कंबरडे माेडले हाेते.
तत्कालीन पाेलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी २ नाेव्हेंबर २०२३ राेजी शेख कासम शेख शेखजी (३१) व शेख अयाज उर्फ भोलु शेख शेखजी (३१) दोन्ही रा. चांदखॉ प्लॉट जुने शहर, अकोला यांना दोन वर्षाकरीता जिल्हयातुन हद्दपार करण्याची कारवाइ केली हाेती. या आदेशाविराेधात दाेन्ही गुन्हेगारांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले हाेते. सुनावणी दरम्यान जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी मांडलेली बाजू भक्कम ठरल्यामुळे उपराेक्त दाेन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यात प्रवेश नसल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी कायम ठेवला.
पाेलिस अधिकाऱ्यावर उचलला हात
पाेलिसांनी नुकत्याच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याविराेधात ‘एमपीडीए’ची कारवाइ करीत ‘जेल’ची हवा खाऊ घातली. जिल्हा कारागृहात त्याला भेटण्यासाठी काही चेलेचपाटे गेले असता, त्यातील एका कुख्यात तरुणाने कारागृह प्रशासनातील वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यावर हात उचलल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी सिटी काेतवाली पाेलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी पाेलिस अधिकाऱ्यावरच हात उचलल्याचा प्रकार पाहता अशा टाेळीविराेधात ‘मकाेका’ची कारवाइ प्रस्तावित केली जाणार का, याकडे अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे.