अकोला: जिल्ह्यात जलसाठ्यांच्या ठिकाणी व्यक्ती बुडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यानुषंगाने आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील जलसाठ्यांच्या (प्रकल्प) ठिकाणी पर्यटकांना प्रवेश मनाई (नो-एन्ट्री) करून, प्रकल्पांच्या ठिकाणी गणेश विसर्जन व दुर्गादेवी विसर्जनावर निर्बंध घालण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाटबंधारे विभाग व जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोमवारी दिला.जिल्ह्यात १३ सप्टेंबरपर्यंत ६३५ मिलिमीटर पाऊस झाला असून, मोठे, मध्यम, लघुपाटबंधारे प्रकल्पांच्या जलसाठ्यांत वाढ झाली आहे. पोपटखेड, घुंगशी व शहापूर या प्रकल्पांच्या ठिकाणी गणेश विसर्जन व दुर्गादेवी विसर्जन करण्यात येते. जिल्ह्यात अनेक प्रकल्पांच्या ठिकाणी व्यक्ती बुडून मृृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. जिल्ह्यात दोन मोठे, पाच मध्यम व ३३ लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झाली असून, पुढील कालावधीत जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थानाच्या दृष्टीने जलसाठ्यांच्या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश मनाई करण्यात यावा. तसेच जलसाठ्यांच्या ठिकाणी (प्रकल्प) गणेश विसर्जन व दुर्गा देवी विसर्जनावरही निर्बंध घालण्यात यावे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, अकोला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे (जलसंधारण) विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला आहे.