लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रिया ठप्प पडल्या आहेत. विशेष म्हणजे खूपच कमी रुग्णांवर उपचार सुरू असून, गत दोन महिन्यात सर्वोपचार रुग्णालयात एकाही नेत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली नाही. उपचार मिळत नसल्याने नेत्ररुग्णांची चांगलीच पंचाईत झाली आहे.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने २२ मार्चपासून लॉकडाऊन लागू केले. या संचारबंदीच्या काळात आरोग्य विभागानेसुद्धा अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या. त्याचा फटका नेत्र रुग्णांनाही बसला. गत दोन महिन्यांपासून सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात केवळ १० टक्के रुग्णांची तपासणी होत आहे. यामध्ये नेत्र रुग्णांची संख्याही मोजकीच आहे. विशेष म्हणजे या रुग्णांची शस्त्रक्रियाही ठप्प पडली आहे.साधारणत: सर्वोपचार रुग्णालयात दर महिन्याला २५० मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात; परंतु कोरोनामुळे या शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत. नेत्र विभागाच्या शेजारीच कोविड वॉर्ड असल्याने रुग्णांना संसर्गाचा धोका आहे. ही बाब लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाने शस्त्रक्रिया रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी २० ते २५ हजार रुपये मोजावे लागत असल्याने रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे.तर मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा पर्याय!जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वाने एकमेव कोविड हॉस्पिटल असलेल्या सर्वोपचार रुग्णलयातील जागेची कमतरता लक्षात घेता अत्यावश्यक नेत्र शस्त्रक्रिया मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात करण्याच्या जीएमसी प्रशासनाच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. तीन महिन्यांपासून शस्त्रक्रिया रखडल्याने अनेक रुग्ण शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे.
सर्वोपचारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सर्वोपचारमधील नेत्र शस्त्रक्रिया बंद आहेत. त्यामुळे मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचा जीएमसी प्रशासनाचा मानस आहे.- डॉ. रमेश पवार,नेत्रचिकित्सा विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला