अकोला : कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना राज्य सरकारांकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. ही मदत राज्य सरकारांच्या आपत्ती निवारण निधीतून दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. माध्यमांमध्ये याबाबतचे वृत्त झळकल्यानंतर कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदतीची आस लागली आहे. तथापि, याबाबत अद्याप कोणताही शासन निर्णय निघालेला नसून, कोणत्याही प्रकारचे दिशानिर्देश राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ही मदत कधी मिळणार, हे अजूनही अनिश्चितच आहे.
कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवार, २२ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. राज्य सरकारांकडून आपत्ती निवारण निधीतून ही मदत देण्यात येईल, असे निश्चित करतानाच यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. आलेल्या अर्जांवर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.
निकषांबाबत प्रशासन अनभिज्ञ
कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित झाले असले, तरी याबाबत अद्याप कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा शासन निर्णय आलेला नाही. त्यामुळे या मदतीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, याबाबत जिल्हा प्रशासन अनभिज्ञ आहे.
कोठे करायचा संपर्क?
माध्यमांमध्ये वृत्त झळकल्यानंतर कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांकडून ही मदत कधी, कशी प्राप्त होणार याबाबत विचारणा केली जात आहे. यासाठीचे निकष काय यासंदर्भातही विचारणा होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता, याबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील कोरोना बळी
११३७
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. तथापि, यासंदर्भात आम्हाला अजून कोणतेही निर्देश नाहीत किंवा तसा जीआरही निघालेला नाही. जिल्ह्यातील मृतांची यादी आमच्याकडे आहे. दिशानिर्देश प्राप्त झाल्यावर त्या दिशेने कार्यवाही करता येईल.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला