मूर्तिजापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी ९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करून मास्क न बांधणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले. याच पृष्ठभूमीवर गत दोन दिवसांत शहरातील २१ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नियमाचा भंग करून तोंडावर मास्क न लावता मुक्त संचार करणाऱ्या गुरुवारी ८ व शुक्रवारी १३ जणांवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून ४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
शहरात कोरोना संसर्गाने पुन्हा डोकेवर काढले असून, दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे तोंडावर मास्क लावणे, विनाकरण गर्दी न करणे, शारीरिक डिस्टन्सिंग ठेवणे व नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणे या कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा सपाटा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी सुरू केला असून, शहरात गुरुवारी मास्क न बांधणारे ८, शुक्रवारी १३ जणांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी नियमभंग मोहीम अधिक कडक करणार असल्याची माहिती दिली. शहारात मास्क न घालणाऱ्या २१ नागरिकांकडून प्रत्येकी २०० रुपये रक्कम वसूल करण्यात आली.
----------
सोशल डिस्टन्सिंग पाळणे व तोंडावर मास्क घालणे बंधनकारक आहे. नागरिकांनी कोरोना त्रिसूत्रीची अंमलबजावणी करून ठरवून दिलेले इतरही नियम काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
-विजय लोहकरे, मुख्याधिकारी, नगर परिषद, मूर्तिजापूर