मुंबई व कोलकाता या महत्त्वाच्या लोहमार्गावर असलेले अकोला रेल्वे स्थानक हे जंक्शन स्टेशन असून, या ठिकाणी मध्य व दक्षिण-मध्य रेल्वेच्या अनेेक गाड्यांचे आवागमण सुरू असते. काेरोना काळात रेल्वेची प्रवासी वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू असल्याने सध्या अकोला स्थानकावरून ४६ विशेष गाड्या सुरू आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुंबई-हावडा, अहमदबाद-हावडा, अमरावती-मुंबई, हटिया-पुणे, सुरत-अमरावती, मुंबई - गोंदिया, कोल्हापूर-गोंदिया आदी गाड्यांचा समावेश आहे, तर दक्षिण-मध्य रेल्वेच्या तिरुपती-अमरावती, जम्मू तावी-नांदेड, जयपूर-हैदराबाद, जयपूर-सिकंदराबाद या लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या पूर्णत: आरक्षित या नियमांखाली सुरू करण्यात आल्या आहेत. या गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांकडून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही, याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमाचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार मंगळवारी निदर्शनास आला. फलाटांवर सर्व नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष दिले जात असले, तरी चालू गाडीमध्ये नियमांचे पालन होते की नाही, याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
स्टेशनवर नियमांची अंमलबजावणी, गाडीमध्ये बेफिकिरी
रेल्वे स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होत असून, सर्व तपासणी केल्यानंतरच प्रवाशांना फलाटांवर सोडण्यात येते. प्रवासी एकदा गाडीत बसले की, नियमांचा फज्जा उडतो. विशेषत: बैठक संरचना असलेल्या डब्यांमध्ये नियमांना बगल दिली जाते. यासंदर्भात पाहणी केली असता, काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. गाड्यांमध्ये असलेल्या टीसी व रेल्वे पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांची ही बेफिकिरी कोरोना संसर्गास कारणीभूत ठरू शकते.
रेल्वे स्थानकावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी होत असून, प्रवाशांची तपासणी केल्यानंतरच त्यांना फलाटांवर सोडले जाते. गाडीत बसलेल्या प्रवाशांकडून नियमांचे पालन हाेणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल, तर त्यांच्यावर कारवाईचे अधिकार टीसी व रेल्वे पोलिसांना आहेत.
- ए. एस. नांदुरकर, स्टेशन मॅनेजर, अकोला.
जाणाऱ्या गाड्या ५०
येणाऱ्या गाडा ५०
एकूण गाड्या १००
जिल्ह्यातून जाणाऱ्या गाड्या
मुंबई-हावडा
अहमदाबाद-हावडा
अमरावती - मुंबई
हटिया - पुणे
सुरत - अमरावती
मुंबई - गोंदिया
कोल्हापूर - गोंदिया
नागपूर - कोल्हापूर
नागपूर - पुणे
नागपूर - मडगाव
मालदा टाउन -सुरत
पुणे - हावडा
ओखा-हावडा
पोरबंदर-हावडा