अकोला: रस्ता अनुदानासाठी प्राप्त ५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधी वाटपावरून काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, भारिप-बमसचे गटनेता गजानन गवई यांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. माइकची तोडफोड, पीठासीन अधिकारी उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल करून विरोधकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाची प्रतिष्ठा पायदळी तुडवल्याचे चित्र गुरुवारी पाहावयास मिळाले. महापालिकेला रस्ता अनुदानापोटी प्राप्त ५ कोटी ७५ लाखाचे वाटप करणे, एलईडीसाठी मंजूर १0 कोटी रुपयांमध्ये १४ व्या वित्त आयोगातून १0 कोटीचा हिस्सा जमा करण्यासह विविध विषयांवर मुख्य सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला सुरुवात होताच रस्ता अनुदानाच्या तयार यादीवरून भारिपचे गटनेता गजानन गवई यांनी आक्षेप नोंदवला. निधी वाटपात सत्ताधारी भेदभाव करीत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गवई यांच्या दिमतीला काँग्रेसचे नगरसेवक मदन भरगड धावून आले. सत्ताधार्यांच्या पक्षपाती धोरणामुळे शहराचे वाटोळे झाल्याचा आरोप गजानन गवई, भरगड यांनी केला. यादरम्यान सभापती विजय अग्रवाल यांनी विकास कामांच्या मंजूर निधीचे वाचन सुरू करताच विरोधकांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. भारिपच्या गटनेत्यांसह नगरसेवकांनी विजय अग्रवाल यांच्या हातातील माइक हिसकण्याचा प्रयत्न केला. तर मदन भरगड यांनी चक्क प्रशासनाचा कॅमेरा हिसकावून घेतला. गदारोळ वाढत असल्याचे पाहून महापौर उज्ज्वला देशमुख यांनी काही वेळासाठी सभा स्थगित केली. दहा मिनिटानंतर सभा सुरू होताच विषयांचे वाचन करून आणि बैठकीतील विषयांना मंजुरी देऊन महापौरांनी सभा आटोपती घेतली.
महापालिका सभागृह नव्हे, आखाडा!
By admin | Published: July 01, 2016 2:07 AM