अकोला: कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी आता रुग्णांच्या नातेवाइकांना औषधीच्या दुकानात ( मेडिकल) जाण्याची गरज राहणार नाही. कोविड रुग्णालयांच्या मागणीनुसार संबंधित ‘मेडिकल’मधून थेट कोविड रुग्णालयांना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी आदेश काढला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविड रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल रुग्णांसाठी कोरोना प्रतिबंधक रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने, रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीतील काळ्याबाजाराचा फटका रुग्णांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिविर विक्रीतील काळ्याबाजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कोविड रुग्णालये रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणाऱ्या औषधी दुकानांना जोडण्यात आली असून, कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयाच्या मागणीनुसार संबंधित औषधीच्या दुकानातून थेट संबंधित कोविड रुग्णालयाला रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना आता औषधीच्या दुकानात जाण्याची गरज राहणार नसून, कोविड रुग्णालयांच्या प्रतिनिधींना औषधीच्या दुकानातून रुग्णांसाठी रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात येणार आहे. असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३ मे रोजी संबंधित यंत्रणांना दिला.
तपासणीसाठी चार पथके गठित!
जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड रुग्णालयांना औषधीच्या दुकानांमधून रेमडेसिविरचा पुरवठा योग्य प्रकारे होतो की नाही तसेच कोविड रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा मागणीप्रमाणे होतो की नाही आणि रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीतील काळाबाजार रोखण्याच्या दृष्टीने तपासणी करण्यासाठी चार पथके गठित करण्यात येत असल्याचा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा औषधीच्या दुकानांमधून कोविड रुग्णालयांना करण्यात येणार आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना औषधीच्या दुकानांत जाण्याची गरज राहणार नाही. संबंधित कोविड रुग्णालयामार्फत रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात येतील. यासंदर्भात तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चार पथके गठित करण्यात आली आहेत.
डाॅ.निलेश अपार
उपविभागीय दंडाधिकारी, अकोला.