- प्रवीण खेते
अकोला: कोरोनाबाधिताच्या जवळून संपर्कात येणाऱ्यास संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो; पण डॉक्टरांच्या विशेष खबरदारीमुळे मागील सहा महिन्यात जिल्ह्यातील एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही. नवजात शिशूला कोरोनापासून दूर ठेवण्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठे यश मिळाले आहे.
कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव पाहता सर्वांमध्येच भीती अन् नैराश्याचे वातावरण आहे. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात चिमुकल्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाचा संसर्ग एकापासून अनेकांपर्यंत झपाट्याने पसरत आहे; पण याही परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे गत सहा महिन्यात एकाही नवजात बालकाला कोरोनाची लागण झाली नाही. यासाठी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विशेष खबरदारी घेत नवजात शिशूंना कोरोनाच्या संसर्गापासून दूर ठेवले आहे. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब आहे. डॉक्टर स्वत: विशेष खबरदारी घेत असून, नवजात शिशूंच्या कुटुंबीयांनादेखील आवश्यक समुपदेशन केले जाते.
अशी घेतली जात आहे खबरदारी
- आई स्वत:च योग्य खबरदारी घेत असेल, तर बाळाला तिच्याकडे सोपविण्यात येते;
- मात्र आईकडून तशी खबरदारी घेण्यात येत नसल्यास स्तनपानासाठी मिल्क बँकेचा आधार घेतला जात आहे.
- शिशूची प्रकृती चांगली असल्यास त्याला नातेवाइकांकडे सोपविले जाते;
- परंतु प्रकृती ठीक नसल्यास शिशूला बेबी केअर युनिटमध्ये ठेवण्यात येते.
- नातेवाइकांना केले जाते योग्य समुपदेशन
डॉक्टरांचे हास्य लपलेय मास्कमागे
बाळाचा जन्म होताच डॉक्टरांचा हासरा चेहरा बाळासमोर असतो; पण कोरोनामुळे गेली सहा महिने डॉक्टरांचे हास्य मास्कमागे लपल्याची खंत जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाबाधित गर्भवतीसाठी जीएमसी राखीव ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी गर्भवतींसह जन्माला येणाऱ्या शिशूंची विशेष काळजी घेतली जाते. त्यामुळेच अद्याप तरी एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही.
- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला