अकाेला : राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार विविध निकषांची पूर्तता न करणाऱ्या हाॅटेल, मंगल कार्यालये, रेस्टाॅरन्ट तसेच लाॅन्सला सील लावण्याच्या कारवाईचा महापालिका प्रशासनाने सपाटा लावला आहे. व्यावसायिकांना काेणतीही पूर्वसूचना किंवा नाेटीस जारी न करता मनपाने कुलूप ठाेकण्याचे हत्यार उपसल्याने लग्नाच्या रेशीमगाठी बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या वर-वधूंच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. मंगल कार्यालये, लाॅन्सला सील लावण्यात आल्याने व्यावसायिकांसह लग्नसाेहळ्याचे आयाेजन करणारे संकटात सापडले आहेत.
शहरातील मंगल कार्यालये, लॉन्स, हाॅटेल्स, रेस्टॉरंटमध्ये लग्नसाेहळा व विविध कार्यक्रमांचे आयाेजन करताना नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने परिसरातील स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी थेट शासनाकडे व राष्ट्रीय हरित लवादाकडे करण्यात आल्या. प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेत राष्ट्रीय हरित लवादाने निकषांची पूर्तता न करणाऱ्या संबंधित प्रतिष्ठानला सील लावण्याचा महापालिकांना आदेश दिला. प्राप्त आदेशाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी व्यावसायिक प्रतिष्ठानला सील लावण्याचे निर्देश दिले. २१ ऑगस्ट पासून मनपाच्या बाजार व परवाना, नगररचना विभाग, जलप्रदाय,अतिक्रमण विभागाने संयुक्त कारवाईला प्रारंभ केला. यादरम्यान, मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्स संचालकांना काेणतीही पूर्वसूचना किंवा नाेटीस देण्यात आली नाही. कारवाईला अचानक सुरुवात केल्यामुळे ठरावीक तारखेला लग्नसाेहळ्यांचे आयाेजन करणाऱ्यांवर संकट काेसळले आहे.
..या निकषांची पूर्तता करणे बंधनकारक
इमारत बांधकाम परवानगी, इमारतीचे वापर प्रमाणपत्र, वाहनतळ सुविधा, अग्निशमन व्यवस्था, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, घनकचरा व द्रवरूप कचऱ्याची व्यवस्था, प्रतिष्ठान व परिसरात सीसी कॅमेरा व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचा पुनर्वापर, मनपाचा व्यवसाय परवाना, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच स्वयंपाक घराची स्वच्छता आदी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
इमारतींची उभारणी करताना अग्निशमन यंत्रणा, वाहनतळाची सुविधा, इमारत बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र, स्वच्छतेची सुविधा उपलब्ध असणे क्रमप्राप्त आहे.
वधू पक्षाच्या तयारीवर फेरले पाणी
काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताच अनेकांनी लग्नसाेहळ्यासाठी मंगल कार्यालये, हाॅटेल व लाॅन्सची नाेंदणी केली. नाेंदणी निश्चित हाेताच वर-वधू पक्षाकडून तयारी करण्यात आली. मनपाच्या कारवाईमुळे वधू पक्षाच्या तयारीवर पाणी फेरल्याचे समाेर आले आहे.
व्यावसायिकांवर दुहेरी संकट
मागील दीड वर्षांपासून काेराेनामुळे लग्नसाेहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्याने मंगल कार्यालये, हाॅटेल, लाॅन्स तसेच कॅटरिंग व्यावसायिक आर्थिक संकटात हाेते. मनपाच्या कारवाईमुळे त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. संबंधित व्यावसायिकांनी विविध निकषांची पूर्तता करण्याची लेखी हमी द्यावी तसेच निश्चित कालावधीत कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यानंतर सील उघडण्यासंदर्भात विचार करता येईल.
- निमा अराेरा, प्रभारी आयुक्त मनपा