शहरातील सर्व्हिस लाइन, सार्वजनिक ठिकाणी साचणारा केरकचरा जमा करून त्याची डम्पिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावण्यासाठी मनपा प्रशासनाने भाडेतत्त्वावर ३२ ट्रॅक्टर नियुक्त केले हाेते. कचरा संकलन करणाऱ्या पुरवठादाराला २००७ पासून सातत्याने मुदतवाढ दिली जात असल्याच्या मुद्यावर बाेट ठेवत प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी थेट ट्रॅक्टरचा पुरवठा रद्द केला खरा परंतु, पर्यायी व्यवस्था ताेेकडी असल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत कचरा संकलनाचा बाेजवारा उडाल्याचे समाेर आले आहे.
शहरातील सार्वजनिक जागा, मुख्य बाजारपेठ तसेच सर्व्हिस लाइनमध्ये साचणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने भाडेतत्त्वावर ३२ ट्रॅक्टरची व्यवस्था निर्माण केली हाेती. त्यावरील मजूर, चालकांचे मानधन व वाहनाचे इंधन मनपाकडून अदा केले जात हाेते. दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ट्रॅक्टर व त्यावरील मजुरांच्या पुरवठ्याला मुदतवाढ देण्याचा मुद्दा पटलावर आला असता प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी एकाच पुरवठादाराला सातत्याने मुदतवाढ का, दरवर्षी नवीन निविदा का प्रसिध्द केली जात नाही, असा मुद्दा उपस्थित केला. वास्तविक यासंदर्भात सत्ताधारी भाजपने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास सहमती देणे अपेक्षित हाेते. भाजपची नेहमीप्रमाणे साेयीची भूमिका पाहून आयुक्त अराेरा यांनी तडकाफडकी हा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु निर्णय घेण्यापूर्वी मनपाकडे असलेली पर्यायी व्यवस्था सक्षम आहे का, याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम समाेर आले आहेत. ऐन हरितालिका, गणेशाेत्सव व ज्येष्ठागाैरींच्या सणासुदीच्या दिवसांत शहरात सर्वत्र घाण व कचऱ्याचे ढीग साचल्याचे किळसवाणे चित्र पहायला मिळत आहे.
प्रत्येक झाेनमध्ये ४ ट्रॅक्टर, एक टिप्पर
मनपाकडे मालकीचे १६ ट्रॅक्टर व ५ टिप्पर आहेत. आयुक्तांनी भाडेतत्त्वावरील ट्रॅक्टर बंद केल्यानंतर प्रत्येक झाेनमध्ये ४ ट्रॅक्टर व दिमतीला एका टिप्परची व्यवस्था केली. परंतु प्रत्येक झाेनचे भाैगाेलिक क्षेत्रफळ व पावसाच्या दिवसांत कचऱ्याच्या समस्येत वाढ हाेत असल्याने ही पर्यायी व्यवस्था अत्यंत ताेकडी ठरत असल्याचे समाेर आले आहे.
४८ कुलींची नियुक्ती केली पण...
मनपाच्या विविध विभागात दडून बसलेल्या तब्बल ४८ पेक्षा अधिक कुलींचा शाेध घेऊन त्यांची कचरा उचलण्याच्या कामासाठी झाेननिहाय नियुक्ती करण्यात आली. सुटाबुटात व जीन्स पॅन्टमध्ये वावरणारे कुली नियुक्त झाले खरे पण, ट्रॅक्टरवर कचरा उचलण्यासाठी त्यांनी ठेंगा दाखवल्याची माहिती आहे.