अकोला: कायम अनुदानित शाळांमधील ‘कायम’ हा शब्द निघाल्यानंतर बिनपगारी शिक्षकांना यंदा तरी हाती वेतन मिळेल, अशी अपेक्षा होती. शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांच्या वेतनाबाबतच्या फाइल तपासल्यानंतर या फाइल शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविल्या; परंतु सध्या फाइल तपासणी अपूर्ण असल्यामुळे पात्र शिक्षकांची दिवाळी यंदाही अंधारात जाणार आहे. दिवाळीपूर्वी या शिक्षकांचे वेतन होण्याची शक्यता कमी आहे.शासनाने २० टक्के अनुदानित आणि १ व २ जुलै रोजीच्या घोषित शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी वेतनाच्या फाइल शाळांकडून मागविण्यात आल्या होत्या. या फाइल शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांनी नजरेखालून घातल्या आणि पात्र शिक्षकांच्या फाइल पुनर्तपासणी आणि मंजुरीसाठी शिक्षण संचालक, पुणे यांच्याकडे पाठविल्या; परंतु फायलींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या फाइल तपासणीसाठी विलंब होत आहे. या फाइलची तपासणी दिवाळीपूर्वी होईल, अशी शिक्षकांना अपेक्षा होती; परंतु फायलींची संख्या पाहता, दिवाळीपूर्वी फायलींना मंजुरी मिळणार नसल्याचे चित्र दिसून येते. यासंदर्भात शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शिक्षकांवर होणारा अन्याय थांबविण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. शासनाने शाळांसाठी अनुदान देण्यासंदर्भात टक्केवारी जाहीर केली; परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांना आता नियमित वेतन मिळणे हा त्यांचा अधिकार असतानाही त्यांच्या वेतनाच्या फायलींचा गठ्ठा शिक्षण संचालक कार्यालयात पडून आहे. त्यामुळे यंदा दिवाळीत बिनपगारी शिक्षकांचे वेतन होणारच नाही. त्यामुळे शिक्षक नाराज झाले आहेत. (प्रतिनिधी)