अकोला: अकोला शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी मिळाला आहे, त्यातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत, यापुढेही विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.
अकोला महानगर पालिका हददीतील मुलभूत सोयी, सुविधे अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, क्राँक्रीटीकरण व नाला बांधकामासह सुधारणाबाबतच्या कामांचे भूमीपूजन आज पालकमंत्री यांच्या हस्ते झाले, या निमित्त सिंधी कॅम्प परिसरातील हिराबाई प्लॉट वाकींग ट्रॅक येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सिंधी कॅम्प परिसरातील विविध विकास कामांचे भूमीपूजन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक हरीषभाई अलीमचंदानी, महानगर पालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण, कन्हैयालालजी रंगवानी, भारुमलजी मुलाणी, किशनचंद धनवाणी, अशोक ओळंबे, दिपक माई, नंदकुमार अलीमचंदाणी, संतोष अग्रवाल आदिंसह परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
विविध विकास कामांच्या माध्यमातून अकोला शहराचा चेहरामोहरा बदलत आहे, येत्या काळातही अनेक विकासाची कामे केली जाणार आहेत, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, मागील काही वर्षांत शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी प्राप्त झाला आहे. यातून अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. लवकरच सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलचे काम पूर्ण होणार असून त्यामुळे गरीब रुग्णांना उपचाराच्या उत्तम सुविधा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील महत्त्वाच्या 14 रुग्णालयांत जिल्हयातील रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी याकरीता सदर रुग्णालयात नाव नोंदणी सुलभपणे करता यावी यासाठी लवकरच येथील शासकीय वैदकीय महाविदयालयात सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्नही तातडीने मार्गी लावल्या जाणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात 500 बेडची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. नेकलेस रोडचे कामही मार्गी लावले जाणार आहे. अमरावती प्रमाणे अकोल्यातही व्यापाऱ्यांसाठी मोठे मार्केट उपलब्ध करुन दिले जाणार आहे. सिंधी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, विविध विकास कामांच्या माध्यमातून अकोल्याचा सर्वागिण विकास केला जाणार आहे.
आमदार गोपीकिशन बाजोरिया म्हणाले की, अकोल्याच्या विकासासाठी पालकमंत्री यांच्या प्रयत्नांमुळे मोठया प्रमाणात निधी मिळत आहे. त्यामुळे शहराचा झपाटयाने विकास होताना दिसत आहे. सिंधी बांधवांच्या विविध प्रश्नांबरोबरच लवकरच करवाढीचा प्रश्नही मार्गी लावल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथीलेष चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.