अकोला: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या खदान पोलीस स्टेशन ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले. रस्त्यावर ठिकठिकाणी पसरलेली चुरी व धुळीमुळे हा मार्ग अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या भाजपाच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना धारेवर धरले. लेखी आश्वासन नको, तर आधी रस्त्यावरील चुरी हटविण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करीत भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील व नगरसेवकांनी चव्हाण यांच्या कक्षात ठिय्या दिला. कार्यकारी अभियंत्यांच्या निर्देशानुसार रस्त्यावरील चुरी हटविण्यास दुपारी प्रारंभ करण्यात आला.शहरात मागील सहा महिन्यांत निर्माण झालेल्या डांबरी रस्त्यांची पहिल्याच पावसात पुरती वाट लागली आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा व प्रमुख असलेल्या अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशन रस्त्याची ‘सी.आर.’ कन्स्ट्रक्शन कंपनीच्यावतीने एप्रिल महिन्यात दुरुस्ती करण्यात आली. पावसामुळे हा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून, कंपनीच्या दर्जाहीन कामाचा त्रास अक ोलेकरांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यासह नेकलेस व शहरातील इतर डांबरी रस्त्यांवर चुरी पसरली असून, त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. रस्त्यांवर पसरलेल्या धुळीमुळे अकोलेकरांना श्वास घेणे मुश्कील झाले आहे. रस्त्यांची दैनंदिन झाडपूस करणारी महापालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेवर स्थानिक लोकप्रतिनिधींचा कवडीचाही वचक नसल्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच भाजपाच्या पदाधिकाºयांसह नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना धारेवर धरले. यावेळी गिरीश जोशी, भाजप गटनेता राहुल देशमुख, नगरसेवक अजय शर्मा, विजय इंगळे, हरिभाऊ काळे, प्रशांत अवचार, सतीश ढगे, सुनील क्षीरसागर, तुषार भिरड, सुनील विंचनकर, प्रकाश घोगलिया, मनोज पाटील, शिवम शर्मा आदी उपस्थित होते.कंत्राटदारांवर नियंत्रण नाही!सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहरात सुरू असलेल्या रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याचे भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची कामे करणाºया कंत्राटदारांवर विभागाच्या अभियंत्यांचे कवडीचेही नियंत्रण नाही. तुमचा विभाग कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवण्यात सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप यावेळी किशोर मांगटे पाटील यांनी केला.मनपाची यंत्रणा सरसावलीरेल्वे स्टेशन रोडवरील चुरी हटविण्यासाठी सकाळी १० वाजता महापालिकेने सफाई कर्मचाºयांची नियुक्ती केली. रस्त्यावरील चुरी हटवून ती ट्रॅक्टरमध्ये जमा करण्यात आली.रस्त्यांची झाडपूस नाहीच!महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने शहरातील रस्ते, सर्व्हिस लाइन, नाल्यांची दैनंदिन साफसफाई करणे क्रमप्राप्त आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्यांची दररोज झाडपूस करणे भाग असताना ती होत नसल्याचे चित्र कायम आहे.आरोग्य निरीक्षकांची पाठराखणप्रभागात दैनंदिन साफसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर निश्चित केली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत शहराची झालेली बकाल अवस्था पाहता आरोग्य निरीक्षकांवर कारवाई होणे भाग असताना त्यांची नगरसेवकांकडूनच पाठराखण केली जाते. एकूणच, अस्वच्छतेला नगरसेवकांचे धोरण कारणीभूत ठरत असल्याचे बोलल्या जात आहे.