अकोला : नाना उजवणे मंडप कॉन्टॅक्टर अँण्ड डेकोरेशन प्रस्तुत लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पध्रेत नोएल इंग्लिश हायस्कूल आणि होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूलने उपांत्य फेरीत धडक दिली.स्पर्धेच्या पाचव्या दिवशी सकाळी पहिला सामना भारत विद्यालय व नोएल इंग्लिश हायस्कूल यांच्यात झाला. भारत विद्यालयाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघाला सात गडी गमावत ९१ धावांचे लक्ष्य दिले. नोएल इंग्लिश हायस्कूलच्या संघाने तीन गडी गमावत दहाव्या षटकातच लक्ष्य पूर्ण केले व भारत विद्यालयाच्या संघाला ७ गड्यांनी नमवून विजय साजरा केला. नोएल इंग्लिश स्कूलचा रितिक कदम याने ३ षटकांत १६ धावा देऊन ३ गडी बाद करून उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत सामनावीर पुरस्कार पटकविला. त्याला मानव स्कूल ऑफ पॉलिटेक्निकचे क्रीडा संचालक सय्यद नजीम यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारत विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अरुण परभणीकर व नोएल इंग्लिश स्कूलचे क्रीडाशिक्षक शरद पवार उपस्थित होते.दुपारच्या सत्रात होलीक्रॉस कॉन्व्हेंट स्कूल व जागृती विद्यालय यांच्यात सामना झाला. जागृती विद्यालयाच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. होलीक्रॉसच्या संघाने प्रथम फलंदाजी करत चार गडी गमावत १२७ धावांचे लक्ष्य दिले. त्या बदल्यात जागृती विद्यालयाचा संघ ११ व्या षटकात ५४ धावांवर बाद झाला. होलीक्रॉसचा ७३ धावांनी विजय झाला.
नोएल इंग्लिश हायस्कूल, होलीक्रॉस स्कूल उपांत्य फेरीत
By admin | Published: January 26, 2015 12:28 AM