ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 17 - रिझर्व्ह बँकने जिल्हा सहकारी बँकांना चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई केली आहे. यामुळे कर्जदार शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतक-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
अकोला जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जदार शेतक-यांच्या खात्यात 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा जमा करण्याची शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी शेतकरी आणि सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सकाळपासून या आंदोलनाला सुरुवात केली आहे. जिल्हा बँकांमध्ये काळा पैसा जमा होऊ नये म्हणून त्यावर बंदी आणल्याची चर्चा आहे. हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता नसून देशभरातील जिल्हा बँकांना लागू करण्यात आला आहे.
मात्र, जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने शेतक-यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. जिल्ह्यातील बहुतांश शेतक-यांचे खाते जिल्हा सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये आहेत. आता या बँकांमध्ये नोटा जमा करता येणार नसल्याने शेतक-यांना त्यांच्याकडील जुन्या नोटा जमा तरी करायच्या कुठे?, असा प्रश्न पडला आहे. यामुळेच हैराण झालेल्या शेतक-यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे.
केंद्र सरकारने 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्याने नोटांचा कमतरता निर्माण झाली आहे. नोटा बदलून घेण्यासाठी आणि नवीन नोटांसाठी बँक, एटीएमसमोर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत बाजारात पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध झालेल्या नाहीत. नोटाबंदी निर्णयाचे सर्वसामान्यांनी स्वागत केले असेल तरी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.