अकोला : शहरालगतच्या खडकी व चांदूर शिवारातील विद्रुपा नदीच्या काठावर सुमारे ३७ एकर शेतीला देण्यात आलेला अकृषक परवाना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणाची सखाेल चाैकशी करुन परवाना रद्द करण्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विजय मालाेकार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
खडकी व चांदूरच्या मध्यातून वाहणाऱ्या विद्रुपा नदीच्या काठावर पूरप्रवण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या चांदूर शिवारातील तीन गट क्रमांकाच्या शेतींना अकृषक (एनए) परवाना देण्यात आला आहे. यामध्ये गट क्रमांक २२/३ मधील २.०७ हेक्टर आर, गट क्रमांक २३/३ मधील १.८२ हेक्टर आर, गट क्रमांक २४/१ मधील ४.३० हेक्टर आर आणि २४/२ मधील ४.४७ हेक्टर आर शेत जमिनीचा समावेश आहे. या चारही गट क्रमांकातील १२.६६ हेक्टर आर एकत्रित क्षेत्राला नगररचना विभागाने निकष, नियम डावलून रहिवासी वापराकरिता अकृषक परवाना दिला. २१ जुलै राेजी विद्रुपा नदीला आलेल्या पुरात येथे १० ते १२ फूट पाणी होते. ही संपूर्ण शेती ही पूरप्रवण क्षेत्राच्या ‘निळ्या रेषे’च्या (ब्ल्यू लाईन) आत असताना नगररचना विभागाने रहिवासी वापरासाठी अकृषक परवाना दिलाच कसा, असा सवाल मालाेकार यांनी तक्रारीत उपस्थित करीत दाेषींवर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीत सेनेच्या आमदाराचा उल्लेख
अकृषक परवाना देण्यात आलेल्या शेत जमिनीच्या प्रकरणात शिवसेनेचे विधान परिषद सदस्य विप्लव बाजाेरिया यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
विद्रुपा नदीच्या काठावर आमची एक फूट जमीन अकृषक झाली नाही. तसेच विक्रीही केली नाही. त्यामुळे ही तक्रार दिशाभूल करणारी असून याप्रकरणी विजय मालाेकार यांच्याविराेधात कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
- विप्लव बाजाेरिया, विधान परिषद सदस्य, शिवसेना