अकोला - पाणीपुरवठा व्यवस्थीत नसणे, सांडपाण्याची विल्हेवाट योग्य तर्हेने न लावणे, पर्यावरण दक्षता ठेवण्यास हलगर्जी तसेच योग्य सुवीधा नसलेले नागरिकीकरण घातक असल्याचे मत आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी शुक्रवारी येथे आयोजीत परिषदेत व्यक्त केले. नगर आणि महानगरातील झोपडपट्टयांमधील वाढत असलेली लोकसंख्या हा चिंतेचा विषय बनला असून त्यामूळे विषमता वाढत जाण्याचा धोका निर्माण होत असल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले.श्री शिवाजी महाविद्यालयात तीन दिवसीय मराठी अर्थशास्त्राच्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. प्रा. नि. वी. सोवणी यांच्या स्मृतीत आयोजीत नागरीकीकरण का व कसे या विषयावरील व्याख्यानाचे प्रमुख वक्ते म्हणूण डॉ. चितळे बोलत होते. पुढे बोलतांना डॉ. चितळे म्हणाले की, पर्यावरणशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र या चार शास्त्रांची सांगड घालून नागरिकीकरण गरजेचे आहे. नागरीकरण योग्य दिशेने व्हावे, त्यांना सुवीधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शहरांमध्ये स्पर्धा लागण्याची आवश्यकता आहे. मात्र शहरांमध्ये स्पर्धा लावण्यापूर्वी त्याचे मापदंड आणि नियमावली आवश्यक आहे. तामीळनाडूतील कोइंबतूरमध्ये रोजगार निर्मीतीसह विविध सुवीधा उपलब्ध होत असून त्या पाठोपाठ जमशेदपूरमध्येही योग्य नागरिकीकरण होत असल्याचा अभ्यास जागतीक बँकेने सुरु केला आहे. चिनमध्ये ज्या प्रमाणे उत्तम शहरे उत्तम जीवन ही योजना राबविण्यात आली याचा बोध भारतीयांनी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. चितळे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर विठ्ठल वाघ, जळगाव खांदेश येथील डॉ. श्रीराम जोशी उपस्थित होते. या व्याख्यानासाठी देशातील तब्बल २00 अर्थशास्त्राचे प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते.
सुविधा नसलेले नागरिकीकरण घातक
By admin | Published: November 07, 2014 11:34 PM