अकोला : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी राज्यातील संप स्थगित झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात केली. त्याचवेळी जिल्हास्तरावर प्रशासनासोबत सुरू केलेले असहकार आंदोलन दुसºयाच दिवशी म्हणजे, सोमवारी मागे घेण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे यांनी असहकार आंदोलन मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.राज्यभरात २२ हजार ग्रामसेवकांनी २२ आॅगस्टपासून सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन मंत्रालयात महाराष्ट्र ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आश्वासनामुळे शनिवारी स्थगित करण्यात आले. त्यावेळी जिल्हा स्तरावर असहकार आंदोलन सुरूच ठेवण्याचा आदेश युनियनच्या राज्यस्तरीय पदाधिकाºयांनी दिला होता. त्यावर सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकाºयांशी चर्चा करण्याचेही ठरले. त्यानुसार चर्चा झाली. त्यामध्ये ग्रामसेवकांनी शासनाचे काम कोणतेही दडपण न बाळगता करावे, संपादरम्यानची कोणतीही कारवाई ग्रामसेवकांवर केली जाणार नाही. ग्रामसेवकांना महाराष्ट्र नागरी सेवा, प्रवेश, वर्तणूक नियमाशिवाय इतर प्रकारे कारवाईसाठी वेठीस धरले जाणार नाही, असे चर्चेत ठरले. ग्रामीण जनतेच्या हितासाठी ग्रामसेवकांनी जबाबदारी समजून काम करावे, त्यामध्ये कोणता ग्रामसेवक कमी पडत असल्यास संघटना पाठीशी घालणार नाही, याबाबीवरही चर्चा झाली. वरिष्ठांनी सोपवलेली कामे नियमानुसार व जबाबदारीनेच केली जातील, असेही यावेळी काटे यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र बोचरे, विभागीय सहसचिव शे. चांद कुरेशी,अकोला तालुकाध्यक्ष गणेश निमकर्डे, सचिव संजय गावंडे, कोशाध्यक्ष महेंद्र अहिर, बार्शीटाकळीचे अध्यक्ष सुधाकर खंडारे, सचिव प्रशांत क्षीरसागर, अरविंद शिंदे, अकोटचे अध्यक्ष गणेश डहाके, सचिव विठ्ठल भदे, बाळापूरचे सुधीर काळे, प्रमोद उगले, पातूरचे लक्ष्मण पल्हाळे, जनार्दन मुसळे, मूर्तिजापूरचे अमित कुरूमकर, गोवर्धन जाधव, तेल्हाराचे इंगळे, अनिल खुमकर यांच्यासह राजीव गरकल, खुमकर, भोंबळे, लहाने उपस्थित होते.