आशिष गावंडे/अकोला
सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या धास्तीने अनेकांची पाचावर धारण बसल्याची स्थिती होती. कोरोनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावल्या जात होते.
सर्वसामान्यांप्रमाणेच प्रशासकीय यंत्रणा अस्वस्थ होत्या. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असणाऱ्या प्रभागात नागरिकांची शिवीगाळ, धाकदपट व असहकार्याची भूमिका सहन करीत मनपातील अधिपरिचारिका रेश्मा शामराव बिकट या निमूटपणे अविरत कर्तव्य निभावत होत्या. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तसेच रजा न घेता त्यांनी कित्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनाना रुग्णालयात दाखल करीत त्यांना जीवदान दिले.
महापालिकेत नागरी आरोग्य केंद्रामार्फत २०१८ मध्ये कंत्राटी तत्त्वावर रेश्मा बिकट यांची अधिपरिचारिका पदासाठी नियुक्ती करण्यात आली. शहरालगत सुमारे १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या बारलिंगा गावातून दररोज दुचाकीने त्यांचे कर्तव्य निभावणे सुरू होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागू केले. सुरुवातीच्या कालावधीत कोरोनाबद्दल अनेक गैरसमज, भीती व धास्तीचे वातावरण होते. अशा स्थितीत ७ एप्रिल रोजी मनपा क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आणि अकोलेकरांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर प्रभाग २ मधील अकोटफाईल परिसरात रुग्ण आढळून आले. त्यावेळी कोरोना विषाणूवर लस किंवा औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक शंकाकुशंका होत्या. अशा वातावरणात रुग्णाच्या अतिसंपर्कातील व हायरिस्कमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिपरिचारिका रेश्मा बिकट सेवारत होत्या. उत्तर झोनमधील अनेक भागात मनपाच्या वैद्यकीय पथकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला.
रुग्णांची केली मनधरणी!
कोरोनाची बाधा झालेल्या व हायरिस्कमधील नागरिकांना कोविड चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागल्याचे रेश्मा यांनी सांगितले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रुग्णांची मनधरणी केल्याचे त्या सांगतात. वाहनात चढल्यानंतर अनेक रुग्ण भीतीपोटी वाहनातून पळ काढत होते.
कोरोनाबद्दल कुटुंबीयांत धास्ती
त्यावेळी घरी पोहोचताना रात्र होत असे. गावात कोरोनाबद्दल अनेक गैरसमज असल्याने सासरकडील मंडळीतही धास्ती होती. अघोळ केल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर जेवण तयार करीत होती. त्यावेळी नातेवाईकांकडून अनेकदा मान-अपमान सहन करावा लागला. नंतर पतीकडून सहकार्य मिळाल्याचे रेश्मा गर्वाने सांगतात.