राज्यभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. अकोला शहरासह जिल्ह्यात ही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत; मात्र तरीही काही नागरिक या निर्बंधांना न जुमानता विनाकारण बाहेर फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी थोडी हयगय केल्याने नागरिकांनी विनाकारण फिरण्याचा सपाटाच सुरू केला. मॉर्निंग वाक, इव्हिनिंग वाक यासह केवळ लॉकडाऊन कशाप्रकारे आहे हे पाहण्यासाठी बाहेर नागरिक निघत आहेत. याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाल्यानंतर त्यांनी शहराच्या विविध ठिकाणी २८ चेक नाके तयार केले. त्यानंतर या चेक नाक्यावरून गस्त वाढविण्यात आली. शनिवारी पहाटे पोलीस अधीक्षकांनी स्वतः एका खासगी वाहनातून गस्त सुरू केली. त्यानंतर शहरात मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६३ जनावर भारतीय दंड विधानाच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मास्क न वापरणाऱ्या १९८ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या पाच आस्थापनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १८ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. अशाप्रकारे एकूण २२१ पेक्षा अधिक जणांवर कारवाई करून सुमारे ४ लाख १ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ, विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांची खासगी वाहनातून गस्त
शहरात २८ ठिकाणी चेक नाके कार्यान्वित केल्यानंतर या ठिकाणी पोलिसांची कामगिरी कशाप्रकारे सुरू आहे. हे तपासण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी एका खासगी वाहनातून शुक्रवार व शनिवारी गस्त घातल्याची विश्वसनीय माहिती आहे. या दरम्यान जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस अधीक्षकांना रोखण्यात आले. खासगी वाहन असल्यामुळे पोलिसांनी ते वाहन अडविले. यावरून पोलीस अधीक्षकांनी तेथील पोलिसांचे कौतुक केले. त्यानंतर अकोला पोलिसांनी प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई तसेच फौजदारी कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.