राजेश शेगाेकार
अकाेला : दबंग चित्रपटातील अभिनेत्रीच्या ताेंडी असलेला एक संवाद खूपच प्रसिद्ध झाला आहे, ती अभिनेत्री म्हणजे ‘थप्पड सें डर नही लगता साहेब अब प्यार से लगता है !’...नेमकी हीच भावना काेराेनाच्या अनुषंगाने आता नागरिकांची झाली असून ‘काेराेना से नही अब ताे लाॅकडाऊन से डर लगता हैं’ अशा प्रतिक्रिया लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीप्रसंगी उमटत आहेत, त्यामुळेच वर्षभरापूर्वी काेराेनाने धास्तावलेल्या नागरिकांमध्ये बिनधास्तपणाही वाढत असल्याचे दिसत आहे.
वर्षभरापूर्वी काेराेनाची भीती हाेती. कुठलेही औषध नसलेल्या या आजाराची व्याप्ती संसर्गातून अधिक वाढत असल्याने पंतप्रधानांनी २२ मार्च राेजी जनता कर्फ्यू पुकारला. या कर्फ्यूला अकाेलेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संध्याकाळी काेराेना याेद्धा कर्मचाऱ्यांसाठी थाली व घंटानादही केला. काेराेनावर मात करण्याचा उत्साह हाेता. आपण काही तरी वेगळे करताेय ही भावना प्रत्येकाची हाेती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधानांनी पुन्हा संदेश देत २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला अन् काेराेनाच्या संकटाची तीव्रता घरातघरात पाेहोचली. ज्याप्रमाणे १८ दिवस महाभारताचे युद्ध चालले त्याचप्रमाणे हे कोरोनाविरुद्धचे युद्ध पुढील २१ दिवस लढायचे आहे अन् ते ही पंतप्रधान महोदयांनी म्हटलं होतं. जसं १८ दिवस कुरुक्षेत्रावर महाभारताचं युद्ध चाललं.. तसं हे २१ दिवसांचं. रस्त्यांवर उतरून नव्हे, तर घरात बसून लढायचं असे जाहीर झाले. सुरक्षित अंतर पाळा, हात धुवा व मास्क लावा, ही त्रिसूत्री घराघरात पाेहोचली. अकाेल्यात तर पहिला रुग्ण ७ एप्रिल राेजी आढळून आला. मात्र, ताे पर्यंत अकाेलेकर एखाद्या युद्धासारखे लाॅकडाऊनला सामाेरे गेले. सगळंच ठप्प होतं त्या काळात. वातावरणात सन्नाटा अन् एखादा जरी कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आला तरी निर्माण होणारी अनामिक भीती, हाेती. या भीतीमध्ये एक गाेष्ट चांगली झाली म्हणजे स्वच्छतेची सवय लागली अन् प्रत्येक कुटुंबात संवाद वाढला. पहिला लॉकडाऊन अनेकांनी घरच्या घरी ‘एन्जॉय’ही केला. पुरुषांचे घरकाम करतानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. घरगुती खेळ, गाण्यांच्या भेंड्या, खाण्याच्या रेसिपिज.. छान विरंगुळा सुरू होता घरोघरी. वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉलिंग, झूम मीटिंग्ज, फेसबुक लाइव्ह.. या डिजिटल प्लॅटफॉर्मचा गाजावाजाही झाला. मात्र, दुसरा लॉकडाऊन घोषित होताच आतापर्यंत सामाजिक संस्था, दानशूरांच्या भरवशावर तग धरणारे मजुरांचे जथे पायीच घराकडे परतू लागले, हातावर पाेट असणाऱ्यांचे भविष्यच धुसर झाले, दुकाने, हाॅटेल, विविध आस्थापनांवरील कामगार, नाेकरांना मालकांनी पगार दिला. मात्र, आता उत्पन्नच नाही त्यामुळे देणार तरी कुठून म्हणून अनेकांना कमी करण्यात आले. राेजगार गेला, कर्जाच्या ओझ्याने लघु व्यावसायिक हवालदिल झाले. सारे अर्थकारणच संपल्याने एकमेकांच्या व्यवसायावर अवलंबून असलेले अर्थचक्र ठप्प झाले. या काळातही काही स्वयंसेवी संस्था अन् सामाजिक संघटना रस्त्यांवर उतरल्या. शेवटी आधार महत्त्वाचा ठरला; पण त्यांनाही मर्यादा हाेतीच. दुसरीकडे काेराेनाचा उद्रेक वाढत असला तरी लाेकांना काेराेनाला अंतरावर ठेवण्याचे मार्ग सापडले हाेते. काेराेनाची धास्ती कमी हाेत गेली, त्यामुळे लाॅकडाऊन नकाे ही भावना बळकट हाेत असून, काेविड टेस्ट करून व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे, कारण अर्थचक्राची गती थांबली, तर आयुष्याचाच ताळेबंद धाेक्यात येऊ शकताे याची जाणीव सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे काेराेनाचा संसर्गही हाेऊ नये अन् अर्थकारणही थांबू नये अशी कसरत सर्वांचीच सुरू आहे, ती लवकर थांबून सर्वांनाच मास्कविना माेकळा श्वास घेता यावा याची प्रतीक्षा आहे.