अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यापूर्वी घोषित करण्यात आलेले शनिवार व रविवारी जिल्ह्यात संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढला असून, जिल्ह्यात शनिवार व रविवारचे संपूर्ण लाॅकडाऊन रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि आस्थापना खुल्या राहणार आहेत.
जिह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ५ मार्चपासून जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यास परवानगी देत, प्रत्येक शनिवार व रविवारी दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गत ४ मार्च रोजी दिला होता. त्यानुसार प्रत्येक शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले होते. दरम्यान, शनिवार व रविवारी जिल्ह्यात घोषित केलेले संपूर्ण ‘लाॅकडाऊन’ राहणार नाही, अशी घोषणा पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी १२ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केली. शनिवार व रविवारी जिल्ह्यात लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. मात्र, वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. लाॅकडाऊन राहणार नाही; मात्र नागरिकांनी ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ व मास्कचा वापर करून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. त्यानुसार शनिवार व रविवारी जिल्ह्यातील संपूर्ण लाॅकडाऊन रद्द करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढला आहे. त्यानुषंगाने शनिवार व रविवारी या देान दिवसांतही जिल्ह्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने व आस्थापना खुल्या ठेवण्यास मुभा राहणार आहे.