लाेकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन कामकाजाला ऑनलाइनची जोड दिली असून, सर्व अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले; मात्र, ‘सर्व्हर डाऊन’मुळे गत एका महिन्यापासून मोबाइलही हँग होत असल्याने ऑफलाइन पद्धतीनेच दैनंदिन नाेंदी घेतल्या जात आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून सहा वर्षांच्या आतील बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देणे, पोषण आहार पुरविणे, बालकांसह स्तनदा माता, मुलींच्या आरोग्याच्या नोंदी घेणे, लसीकरण यांसह विविध प्रकारची कामे केली जातात. जिल्ह्यात १०७६ अंगणवाडी केंद्रे असून, १०७६ अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. या सर्व अंगणवाड्यांचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाइल देण्यात आले आहेत. स्मार्टफोन कसा वापरावा आणि त्याद्वारे दररोजचा अहवाल कसा पाठवावा, याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांनाही देण्यात आले; मात्र ‘सर्व्हर डाॅऊन’मुळे मोबाइलही हँग होत असल्याने ऑनलाइनची कामे प्रभावित झाली आहेत. यावर पर्याय म्हणून ऑफलाइन पद्धतीने दैनंदिन कामांच्या नोंदी घेण्यात येत आहेत.
सर्व्हर डाऊनची अडचण!
‘सर्व्हर डाऊन’चा प्रकार वाढीस लागला आहे. अंगणवाडी केंद्रांच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत असल्याने यामुळे ऑनलाइन नोंदी अपलोड करण्यात तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने अंगणवाडी सेविका त्रस्त झाल्याचे दिसून येते.
तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न
माेबाइलला नेटवर्क नसल्याच्या ताेंडी तक्रारी आल्या आहेत. सर्व्हर डाऊनचाही प्रकार आहेच. या संदर्भात जिल्हा समन्वयकांच्या स्तरावर अडचणी दूर करण्याचा प्रयत्न हाेत आहे
- विलास मसराळे
महिला व बालकल्याण अधिकारी जि. प. अकाेला
मोबाइलवरून करावी लागणारी सरकारी कामे
- बालकांचे वजन, उंचीच्या नोंदी घेतल्यानंतर याबाबतची दैनंदिन माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यात येते.
- शासनाच्या विविध उपक्रमांतर्गत गृहभेटी देण्यात येतात. याबाबतच्या दैनंदिन नोंदी ठेवणे.
- अंगणवाडी केंद्राला संबंधित अधिकारी, वरिष्ठांनी भेट दिल्यानंतर या संदर्भातील माहितीची नोंद ठेवणे.
- अंगणवाडी केंद्रात विविध प्रकारचे लसीकरण झाल्यानंतर, याचा दैनंदिन अहवाल ऑनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करणे.
- अंगणवाडी केंद्रामार्फत पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या दैनंदिन नोंदी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतात.
- स्तनदा माता, मुलींच्या आरोग्याची तपासणी अंगणवाडी केंद्रात केली जाते. याबाबतच्या दैनंदिन नोंदी ऑनलाइन पद्धतीने वरिष्ठांना सादर करणे.