- राजू चिमणकरअकोला : अपंगांना ज्याप्रमाणे दिव्यांग संबोधल्या जाते त्याचप्रमाणे अनाथांना स्वनाथ संबोधण्यात यावे. १८ वर्षांनंतर अनाथ मुला-मुलींच्या भवितव्याचा फार मोठा प्रश्न आहे. शासनाने अनाथांच्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. अनाथांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे, असे मत ‘अनाथांचे आधार’, एकच धर्म मानव धर्म या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुलक्षणा अहेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. उत्कर्ष शिशुगृह, गायत्री बालिकाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्रेह संगम २०१८ च्या सोहळ््यासाठी त्या अकोल्यात आल्या होत्या. त्यांच्या कार्याबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : ‘अनाथांचे आधार’ची संकल्पना समाजात कशी रुजली?वयाच्या १८ वर्षांनंतर अनाथाश्रमातील मुला-मुलींना बाहेर काढले जाते. त्यांच्यासमोर मोठे संकटच उभे राहते. त्यांचा गैरफायदा घेत अनाथ मुला-मुलींना वाममार्गाला लावले जाते. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारीचे कृत्य घडू नये, यासाठी राज्यभरातील १८ वर्षांनंतरच्या मुला-मुलींना भक्कमपणे पाठबळ मिळावे, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन त्यांच्या करिअरसाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ‘अनाथांचे आधार’ संकल्पना तयार झाली. ती आता खºया अर्थाने समाजामध्ये रुजत आहे. विविध उपक्रमांना समाजदूतांकडून मदतीचा हात मिळत आहे.
प्रश्न : सध्या आपले कार्यक्षेत्र ?राज्यभरातील दीडशेंवर १८ वर्षांवरील मुला-मुलींच्या भवितव्यासाठी संस्था कार्यरत आहे. मुला-मुलींमध्ये राज्यातील मुला-मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे अनाथ मुला-मुलींनी स्वत:च पुढाकार घेऊन हे कार्य सुरू केले आहे. मुंबईचे अभय तेली, नागपूरचे अमित वासने, पुण्याच्या मयुरी जोशी यांचाही या कार्यात मोठा वाटा आहे. गत पाच वर्षांपासून संस्थेची वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या कार्याला पोलिसांचा सपोर्ट मिळत आहे.
प्रश्न : अनाथांच्या पुर्नवसनासाठी शासनाची भूमिका काय ?१८ वर्षांनंतरच्या अनाथ मुला-मुलींच्या पुर्नवसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. यासाठी शासनाने महत्त्वाची भूमिका निभावणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अनाथांना एक टक्का आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी. म्हाडा, सिडकोमध्ये अनाथ मुला-मुलींना घरे देण्यात यावीत. शासनाने अनाथ मुला-मुलींच्या भविष्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.शासनाने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष दिल्यास अनाथांनासोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल.
प्रश्न : यंदाच्या महत्त्वाच्या उपक्रमाबाबत काय सांगाल ?अनाथांची दिवाळी हा उपक्रम यंदा नाशिकमध्ये घेण्यात येत आहे. यामध्ये १६ ते १९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान राज्यातील अनाथ एकत्र येऊन दीपोत्सव साजरा करणार आहेत. यानिमित्ताने विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नाशिक परिसराची भ्रमंती, विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांची भेट, अनाथ मुला-मुलींचे समुपदेशन, जीवनविषयक दृष्टीकोन सांगणारी शॉर्ट मुव्हीचे प्रदर्शन, कपड्यांसह विविध जीवनोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात येईल. अनाथ मुला-मुलींना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. अनाथ मुला-मुलींमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करण्यात येणार आहे.