अकोला: शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती होणार होत्या; परंतु त्याला ब्रेक लागला आहे. पात्र उमेदवारांची यादीच जाहीर न झाल्यामुळे शिक्षक भरती पुन्हा लांबणीवर पडली आहे. पवित्र पोर्टलवर ज्या शिक्षण संस्थांनी जाहिराती दिल्या, त्या संस्थांसाठी पात्र उमेदवारांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. यादी प्रकाशित झाल्यानंतरच मुलाखतींना सुरुवात होणार आहे.नऊ वर्षांनंतर रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये सातत्याने अडथळे येत आहेत. मुलाखातीशिवाय भरतीसाठी आलेल्या जाहिरातीनुसार उपलब्ध असलेल्या ५ हजार ८२२ पदांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर करून १३ ते २१ आॅगस्टदरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार होती; परंतु प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला ब्रेक लागत असल्यामुळे उमेदवारांच्या मनात धाकधूक होत आहे. अद्यापपर्यंत पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, मुलाखती पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. आता सप्टेंबर महिन्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. शिक्षक भरतीमध्ये माजी सैनिकांसाठी १ हजार जागा सोडण्यात आल्यामुळे सर्वच प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झाला होता. माजी सैनिकांमध्ये डी.एड., बी.एड. आणि शिक्षक पात्रता, अभियोग्यता चाचणी दिलेले उमेदवार नसल्यामुळे या जागा रिक्त राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळेच माजी सैनिकांच्या राखीव जागा आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांना या जागा उपलब्ध करून त्यांची गुणवत्तेच्या आधारावर निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शिक्षण आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनुसार शिक्षण संस्थाचालकांची बैठक घेतली; परंतु पात्र उमेदवारांची यादी जाहीर न झाल्यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. ती लवकरच सुरू होईल.- प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारीमाध्यमिक, जि.प. अकोला