अकोला : पीक विमा योजनेत गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्यावर पीक नुकसानभरपाईपोटी एक रुपयाही मिळाला नाही. काढलेल्या पीक विम्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही पीक विमा भरणार कसे, असा सवाल कोळासा येथील सरपंचांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांपुढे केली.
पीक विमा आणि पीक कापणी प्रयोग यासंदर्भात अडचणी सोडविण्याच्या मुद्द्यावर कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणीया, विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी दिलीप सेन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी दिनकर प्रधान, तंत्र सहायक रूपाली मेंगजे आदी उपस्थित होते. पीक विमा योजना तसेच पीक कापणी प्रयोगासंदर्भात या वेळी सरपंच आणि शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच यासंदर्भातील अडचणींवर सरपंच आणि शेतकऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सरपंच आणि शेतकऱ्यांनी पीक विमा व पीक कापणी प्रयोगातील अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. त्यामध्ये ‘गेल्या वर्षी पीक विमा काढूनही गावातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईचा एक रुपयाही मिळाला नाही. त्यामुळे काढलेल्या पीक विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनीच्या घशात जात असेल तर, यंदाही शेतकरी पीक विम्याची रक्कम कसे भरतील, असा प्रश्न कोळासा येथील सरपंच शेषराव वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. पीक विमा योजनेतील जाचक अटी वगळण्याची मागणीही सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
उंबरठा उत्पादनाची अट वगळा!
पीक विमा योजनेत मागील सात वर्षांचे उंबरठा उत्पादन ग्राह्य धरण्याची अट वगळण्यात यावी, तसेच महसूल मंडळनिहाय अट रद्द करून गावनिहाय पीक नुकसानभरपाई देण्याची मागणी गांधीग्राम येथील शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह जिल्ह्यातील सरपंच व शेतकऱ्यांच्या वतीने या बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने पीक विमा योजनेतील संबंधित अटी शिथिल करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी या वेळी दिले.
...................................
बोंडअळीने शेतकरी हैराण;
पीक विम्याचे संरक्षण द्या!
कपाशी पिकावर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या पीक नुकसानामुळे शेतकरी हैराण असून, पीक नुकसानीपोटी एक रुपया मिळत नाही. त्यामुळे बोंडअळीमुळे होणाऱ्या नुकसानीला पीक विम्याचे संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी उमेश काठोळे यांच्यासह सरपंच आणि शेतकऱ्यांनी या बैठकीत केली. तसेच पिकांवरील कीडरोगामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई का मिळत नाही, असा प्रश्नही एका सरपंचाने या वेळी उपस्थित केला.
......................