अकोला: वैयक्तिक शौचालयांसाठी सेप्टिक टॅँक न बांधता थेट नालीद्वारे घाण सोडणार्या दक्षिण झोनमधील पक्की खोलीस्थित ४0 रहिवाशांवर महापालिका प्रशासनाने कायद्याचा दंडुका उगारला आहे. संबंधितांना नोटीस जारी करून २१ दिवसांत खुलासा सादर करण्याचे प्रशासनाचे निर्देश आहेत. खुलासा समाधानकारक नसल्यास थेट इमारतींवर कारवाई केली जाईल ग्रामीण भागात हगणदारीमुक्त अभियान चालविल्यानंतर आता शहरी भागातही वैयक्तिक शौचालय निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मनपा क्षेत्रात ज्या नागरिकांकडे वैयक्तिक शौचालय नाही, त्यांचा शोध घेऊन अर्ज भरून घेण्यासाठी आयुक्त अजय लहाने यांनी आरोग्य निरीक्षकांना आदेश दिला. त्यानुसार आरोग्य निरीक्षकांनी शोध घेतला असता, दक्षिण झोनमधील पक्की खोली परिसरातील काही उच्चभ्रू नागरिकांकडे शौचालयांसाठी सेप्टिक टॅँकच उपलब्ध नसल्याचे ८ ऑक्टोबर रोजी आढळून आले. शौचालयाची घाण थेट नालीद्वारे सोडल्या जात असून, या गंभीर प्रकारामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. अशा नागरिकांची संख्या एक, दोन नव्हे तर तब्बल ४0 पेक्षा जास्त असल्याची माहिती आहे. ही बाब उजेडात येताच, आयुक्त लहाने यांनी कलम ३0१ अन्वये संबंधित नागरिकांना नोटीस जारी करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. २१ दिवसांच्या आत नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यास इमारतीवर गजराज चालणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सेप्टिक टँक नसलेल्या ४0 जणांना नोटीस !
By admin | Published: October 16, 2015 2:02 AM