अकोला: अकोलान्यायालयातील पहिल्या जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच अवमानकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी अकोला जिल्हा न्यायालयातील चार विधिज्ञांना अवमानना नोटीस बजावण्यात आली असून, यासंदर्भात सदर विधिज्ञांना न्यायालयासमोर उत्तरही द्यावे लागल्याची माहिती आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी २७ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे.न्यायालयीन कामकाजाला अनुसरून न्यायाधीशांच्या बाबतीत वकिलांच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवरून एका जिल्हा व सत्र न्यायाधीशांचा अवमान होईल, अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर व्हायरल झाला होता. ही बाब न्यायाधीशांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी केली. चौकशीमध्ये चार वकिलांनी आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. हेतुपुरस्सर या पोस्ट करण्यात आल्याच्या निर्णयापर्यंत न्यायालय पोहोचले. त्यानंतर अखेर न्यायाधीशांनी ठोस भूमिका घेत या चारही विधिज्ञांच्या विरोधात उच्च न्यायालयात अवमान केल्याचा संदर्भ दिला व वकिलांनी केलेली कृती हे न्याय व्यवस्थेचा अवमान करणारी असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणााची दखल घेत उच्च न्यायालयाने संबंधित चारही वकिलांना नोटीस दिलेल्या असून, त्यानुसार ११ मार्च रोजी उच्च न्यायालयात या चार वकिलांना उपस्थित राहण्याचा आदेश दिला होता. तारखेनुसार चारही वकील उपस्थित झाले होते. एका महिला न्यायाधीशांविरुद्ध अशा प्रकारचा अवमानजनक उल्लेख केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर २७ मार्च रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. याप्रकरणी न्यायाधीश आणि वकिलांमध्ये समेट घडवून आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले होते; मात्र त्यानंतरही याबाबत योग्य तोडगा न निघाल्याने प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले असून, न्यायालयातील या प्रकरणावर आता उच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.