लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: इयत्ता नववीच्या सर्वच विषयांचा अभ्यासक्रम पुनर्रचित करून विषय योजना तसेच मूल्यमापन योजनेत बदल करण्यात आला. त्याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. नववीचा अभ्यासक्रम बदलल्याबाबतच्या सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहे. यंदा प्रथमच नववीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन विषयांऐवजी स्व विकास व कलारसास्वाद विषयाचा समावेश करण्यात आला आहे. नववीचा अभ्यासक्रम बदलल्याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले. इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमामध्ये माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) हा विषय स्वतंत्र न राहता, आयसीटीचा सर्वच विषयांमधून अंतर्भाव करण्यात आला आहे. सामान्य गणित हा विषय न ठेवता, बीजगणित व भूमिती ही पुस्तके राहतील आणि सामाजिकशास्त्र विषयांतर्गत भूगोल विषयाबरोबरच अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय न राहता, भूगोल व गणित या दोन्ही विषयात अर्थशास्त्राचासुद्धा समावेश केला आहे. तसेच यंदा प्रथमच व्यक्तिमत्त्व विकास, कार्यानुभव, समाजसेवा व व्यवसाय मार्गदर्शन विषयांऐवजी नववीच्या विद्यार्थ्यांना, आरोग्य व शारीरिक शिक्षण, स्व विकास व कलारसास्वाद विषय शिकविला जाणार आहे. शालेय प्रमाणपत्र विषयात संरक्षणशास्त्र हा विषय राहणार आहे. या विषयाला एमसीसी, स्काउट गाइड, नागरी संरक्षण व वाहतूक सुरक्षा, एनसीसी हे विषय पयार्य म्हणून राहतील. यासोबतच शिक्षण व्यवसायाभिमुख व्हावे. यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत एनएसक्यूएफचे इयत्ता नववी, दहावी स्तरावर एकूण दहा विषय सुरू करण्यात आले असून, हे विषय शासन आदेशानुसार इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना द्वितीय किंवा तृतीय भाषा आणि सामाजिकशास्त्रे विषयाला पर्याय म्हणून निवडता येतील. आदी बदल नववीच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात पुढील वर्षी बदल करण्यात येईल. असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी स्पष्ट केले. तिसरी, चौथी व पाचवीचीही पाठ्यपुस्तके बदलणार!प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २0१२ सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरी वर्गाचा परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) आणि इयत्ता चौथी, इयत्ता पाचवी वर्गाचा परिसर अभ्यास भाग १ व २ ही पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २0१८-१९ मध्ये बदलणार आहेत, अशी माहितीही पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. नववीचा अभ्यासक्रम बदलल्याचे पत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून प्राप्त झाले आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी
इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात बदलाच्या शाळांना सूचना
By admin | Published: June 07, 2017 1:25 AM