अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत चक्क शासनाचीच फसवणूक करण्याचा प्रताप जिल्ह्यातील ७९ शिक्षकांनी केला आहे. त्या सर्वांची वेतनवाढ रोखून मूळ ठिकाणी पुन्हा बदली करण्याची कारवाई येत्या दोन दिवसांत केली जात आहे. त्यापूर्वी त्यांना स्पष्टीकरण सादर करण्याच्या नोटीस प्रभारी शिक्षणाधिकारी देवेंद्र अवचार यांनी २७ जुलै रोजीच बजावल्या आहेत.जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केली. संवर्ग एकमध्ये बदलीचा लाभ मिळण्यासाठी काही शिक्षिका एकट्याच राहत असून, त्यांनी कुमारिका किंवा परित्यक्ता असल्याचे दाखवले आहे. तर काहींनी घटस्फोटित असल्याचेही नमूद केले. काहींनी आजार, पाल्याचा आजार दाखवला आहे. संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रीकरणासाठी गावांमधील अंतराची खोटी माहिती देणे, संवर्ग १ मध्ये आजाराची खोटी माहिती देण्याºयावर कारवाई करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने २८ जून रोजी दिला होता. शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली मिळण्यासाठी आरोग्यविषयक समस्यांची खोटी कागदपत्रे जोडली. त्यातून त्यांना सोयीची शाळा मिळाली, तर काहींनी अंतर, पती-पत्नी एकत्रीकरण, पाल्याचे आजारपण या बाबीही नोंद केल्या. त्याचा फायदा त्यांना मिळाला. त्याचवेळी पात्र शिक्षकांवर अन्याय झाला. संवर्ग १ आणि २ मध्ये माहिती सादर केलेल्या शिक्षकांची तातडीने पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये संवर्ग १ मध्ये ३५ शिक्षकांची माहिती खोटी असल्याचे पुढे आले, तर संवर्ग २ मध्ये ४४ पती-पत्नी शिक्षकांची माहिती खोटी आहे. त्या सर्वांना प्रत्यक्ष उपस्थित राहून बाजू मांडण्याची संधीही आधीच प्रभारी शिक्षणाधिकारी अवचार यांनी दिली. त्यानंतर आता थेट कारवाईची नोटीस बजावण्यात आली.
विस्थापित शिक्षकांना मिळणार संधी!विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२ नुसार सोयीच्या ठिकाणी बदलीसाठी खोट्या कागदपत्रांचा आधार घेणाºयांच्या पडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्याची कारवाई केली जाईल. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बदली झालेल्या शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी पुन्हा पदस्थापना देतील. त्याचवेळी खोट्या शिक्षकांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ जागी पदस्थापना दिली जाणार आहे. आंतरजिल्हा बदलीतील शिक्षक मूळ जिल्ह्यातआंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत आलेल्या ३४ शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात रुजू होण्याचे शासनानेच बजावले आहे. त्यामुळे त्या शिक्षकांना परत जावे लागले.- माहिती न भरणारे धास्तावले...आॅनलाइन बदली प्रक्रियेत माहिती न भरताच त्यातून सूट मिळवणारे शिक्षक आता धास्तावले आहेत. शासनाकडूनच कारवाईचा आदेश आहे. त्यामुळे कारवाई होण्यापूर्वीच त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे धाव घेत निवेदन दिले. मात्र, आता त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.