लोकमत इफेक्ट
खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री येथील बसस्थानकाजवळ झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २ जानेवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करताच स्थानिक प्रशासनाला जाग आली असून, तक्रारीची दखल घेऊन ग्रामपंचायतीकडून ५ जानेवारी रोजी अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात आले आहे.
खेट्री येथे गत वीस ते पंचवीस वर्षांपासून झोपडपट्टी वस्ती वसली आहे. या वस्तीतील ग्रामस्थ मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. झोपडपट्टीला गावाशी जोडणारा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर काही जणांनी अतिक्रमण केल्याने रस्ता अरुंद झाल्याने रस्त्याने जाताना अडचण निर्माण होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे २९ डिसेंबर रोजी निवेदन देऊन कारवाई करून अतिक्रमण आठ दिवसाच्या आत हटविण्याची मागणी केली होती. अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनातून दिला होता. याबाबतचे ‘लोकमत’ने २ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच संबंधी स्थानिक प्रशासनाला जाग आली असून, अतिक्रमण करणाऱ्यांना ५ जानेवारी रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत अतिक्रमण मोकळे करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसद्वारे देण्यात आला आहे. बातमीचा फोटो घेणे